
‘ऑपरेशन सिंदूर’च्या तडाख्याने बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानच्या लष्करी तळांवर आणि सीमेजवळच्या राज्यांमध्ये ड्रोन्स आणि क्षेपणास्त्राद्वारे हल्ले केले. परंतु, हे हल्ले हिंदुस्थानच्या एअर डीफेन्स प्रणालीने हाणून पाडले. आता एकाहून अधिक ड्रोन्स एका झटक्यात पाडणारे भार्गवास्त्र हिंदुस्थानला मिळाले आहे. हे एक नवीन स्वदेशी काऊंटर ड्रोन असून याची यशस्वी चाचणी ओदिशात घेण्यात आली.
भार्गवास्त्र नावाच्या नवीन आणि कमी किमतीच्या काउंटर ड्रोन प्रणालीची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही ड्रोन प्रणाली वाढत्या ड्रोनच्या धोक्याला तोंड देण्यासाठी महत्वपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी दोन चाचण्यांमध्ये प्रत्येकी एक रॉकेट डागण्यात आले. दोन सेकंदात सॅल्व्हो मोडमध्ये दोन रॉकेट डागण्यात आली. चारही रॉकेट्सनी उत्तम कामगिरी गेली. समुद्र सपाटीपासून तब्बल 5 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या विविध भूप्रदेशांवर तैनातीसाठी डिझाइन केलेली ही प्रणाली हिंदुस्थानच्या सशस्त्र दलांसाठी महत्वाची ठरणारी आहे.