
भारतीय कामगार सेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विमानतळ विभागातील दिवंगत कामगारांच्या नातेवाईकांना दिवाळी भेट वस्तू व आर्थिक मदत देण्यात आली. अंधेरीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल-2 कार्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. उपक्रमाचे यंदाचे हे बारावे वर्ष असून गेल्या वर्षभरात दुर्दैवी मृत्यू झालेल्या 20 मृतांच्या कुटुंबीयांना ही मदत देण्यात आली. दिवंगत कामगारांची आठवण ठेवल्याबद्दल नातेवाईकांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले.
दिवाळीत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते, मात्र ज्या कामगारांचे निधन झाले आहे त्यांच्या घरातील वातावरण लक्षात घेऊन भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाच्या वतीने दिवाळीच्या सुरुवातीला अशा कामगारांच्या कुटुंबीयांना दिवाळी भेटवस्तू व आर्थिक मदत देऊन त्यांचे सांत्वन करण्यात येते. यंदाही भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अरविंद सावंत म्हणाले, कामगारांचे नेतृत्व करताना पगारवाढ, बोनस, वाढीव डी.ए. व सुट्टय़ा असे त्यांचे विविध प्रश्न सोडवत असतो. कामगार हयात नसतानासुद्धा त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे भारतीय कामगार सेना खंबीर उभी राहत असते हे यातून दिसून येते.
हा उपक्रम राबविल्याबद्दल भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांचे विशेष आभार उपस्थित नातेवाईकांनी मानले. भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस संतोष कदम, मयूर वणकर, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, पोपट बेदरकर, गोविंद राणे, सहचिटणीस मिलिंद तावडे, विजय शिर्पे, नीलेश ठाणगे, विजय तावडे, दिनेश पाटील, दिनेश परब, कार्यकारिणी सदस्य, युनिट कमिटी व कामगार यावेळी उपस्थित होते.


























































