शिवसेना मोठी करण्याचा संकल्प करू या! भास्कर जाधव यांचे शिवसैनिकांना आवाहन

शिवसेनेच्या 58 वर्षांच्या काळात जो जो शिवसेनेच्या अंगावर आला त्याला आपण शिंगावर घेतले. ज्याला ज्याला आपण मोठे केले त्याला मस्ती आल्यावर त्याला त्याची जागा दाखवली. भविष्यात कोणाला छोटे करण्यात आपली बुद्धी, वेळ, ताकद खर्ची घालण्यापेक्षा मी माझी शिवसेना मोठी करेन, असा संकल्प करू या आणि विधानसभेसाठी उद्धव ठाकरे जो मंत्र देतील तो घराघरात पोहोचवू या, असे आवाहन शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.

शिवसेनेच्या वर्धापनदिनी भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या जन्मापासून आतापर्यंतच्या संघर्ष आणि विजयाची रांगडय़ा पद्धतीने मांडणी करत शिवसैनिकांना उत्साह वाढवला. ते म्हणाले, 106 हुतात्मे देऊन मुंबईसह महाराष्ट्राची स्थापन झाली. पण मुंबई मिळवणारा मराठी माणूस कुठे यावर चर्चा सुरू झाली तेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्याला आज 58 वर्षे पूर्ण होत आहेत.

आमच्या स्ट्राइक रेटच्या नादाला लागू नका!

इंडिया आघाडीचे मिळून 30 खासदार निवडून आले आहेत. हा उद्धव ठाकरे यांचा 200 चा स्ट्राइक रेट आहे. तुम्ही 13 नेले, 5 उरले होते. आम्ही पाचवरून पुन्हा 9 निवडून आणले. हा आमचा स्ट्राइक रेट आहे. आमच्या स्ट्राइक रेटच्या नादाला लागू नका, कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.

बाळासाहेबांचा आम्हाला आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद होता. शिंदे गट, भाजप, अजित पवार गटाने 48 जागांवर लढताना बाळासाहेबांच्या फोटोचा वापर केला; पण तरीही या तिघांना महाराष्ट्रात केवळ 17 जागा मिळाल्या आणि शिवसेनेच्या जागा 5 वरून 9 वर गेल्या, असे भास्कर जाधव म्हणाले.

दिल्लीश्वरांना तडीपार करणारा आवाज महाराष्ट्रातून निघाला

दिल्लीश्वरांनी देशात दहशत निर्माण केली होती. त्यात 400 पारचा नारा दिला गेला. जणू काही तेच सत्तेत येणार होते; पण हा सर्व संघर्ष सुरू असताना 400 पारच्या नाऱ्याला छेद देणारा आवाज महाराष्ट्रातून निघाला आणि तो आवाज होता उद्धव ठाकरे यांचा. उद्धव ठाकरे यांनी ‘इस बार तडीपार’ हा मंत्र दिला आणि हा मंत्र देशात घुमला, असे भास्कर जाधव म्हणाले.