
विरारहून दादरच्या दिशेने धडधडत निघालेली लोकल भाईंदर स्थानकात न थांबता चक्क दोन किमी पुढे धावली. गाडी थांबवायला मोटरमन विसरल्याने भाईंदर स्थानकात उतरण्यासाठी दरवाजात रेटारेटी करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. नेमके काय झाले कुणालाच कळेना. अखेर पुढे जाऊन लोकल थांबवल्यानंतर प्रवाशांनी ट्रॅकवर उड्या मारत पायपीट करत परतीचा प्रवास केला. या धक्कादायक प्रकाराची चौकशी करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
विरारहून सकाळी १०.४४ ची लोकल दादरच्या दिशेने निघाली. लोकलला वसई रोड, भाईंदर, दहिसर, अंधेरी आणि दादर असे थांबे होते. वसई रोडचा थांबा घेतल्यानंतर ती वेगात निघाली. भाईंदर येथे थांबा असतानाही ही लोकल फलाटापुढे गेली. काही वेळाने मोटरमनच्या लक्षात येताच त्याने लोकल थांबवली. मात्र तोपर्यंत लोकल दोन किलोमीटर पुढे गेली होती. स्थानकाच्या पुढे लोकल थांबल्याने प्रवाशांनी रुळांवर उतरून स्थानक गाठले. जलद लोकल पकडण्याच्या तयारीत असलेले भाईंदर स्थानकातील प्रवासी लोकल न थांबल्याने गोंधळले.
रेल्वे कर्मचाऱ्यांची धाव
लोकलच्या पाठीमागून एसी लोकल आली. संतप्त प्रवाशांनी एसी लोकल पकडली. खचाखच भरलेल्या एसी लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्यांनी फलाटावर धाव घेतली. आम्हाला कार्यालयात वेळेवर पोहोचायचे आहे असे सांगत प्रवाशांनी एसी लोकलमधून उतरण्यास नकार दिला. अखेर प्रवाशांना एसी लोकलने प्रवास करण्याची मुभा दिल्यानंतर वाद मिटला. विरार-दादर १५ डबा लोकलने भाईंदर थांबा का चुकवला, याबाबत पश्चिम रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत.

























































