भाईंदरमधील सॅनिटरी नॅपकिन मशीन भंगारात, महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात; पाच वर्षात धूळही झटकली नाही

मीरा-भाईंदर महापालिकेने पाच वर्षांपूर्वी खरेदी केलेली सॅनिटरी नॅपकिन मशीन भंगारात गेली आहे. या मशीनचा एकदाही वापर न झाल्याने ही वेळ आली असून पालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. निविदा न काढताच मशीन खरेदीची प्रक्रिया राबवली असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारामध्ये उघडकीस आली आहे. या बेफिकीर कारभाराला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल भाईंदरवासीयांनी केला असून या सॅनिटरी नॅपकिन मशीन खरेदी व्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महिला व बालकल्याण विभागाने शहरातील महिलांसाठी 2019 मध्ये 3 लाख 55 हजार रुपये खर्च करून सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन खरेदी केली होती. गरजू महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी निर्माण करणे व कमी किमतीत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मशीन खरेदी केली होती. तत्कालीन सभापती दीपिका अरोरा यांनी लेखी पत्राद्वारे यंत्रणा खरेदी करण्याची मागणी केली होती. संस्कृती एंटरप्रायझेस या एकाच ठेकेदाराकडून कोटेशन मागवून ही मशीन खरेदी केली आहे. त्यानंतर तीन वर्षांसाठी एका स्वयंसेवी संस्थेबरोबर करार केला

खुलासा आल्यानंतर पुढील निर्णय घेणार
सॅनिटरी मशीन सिल्वर सरीता, काशीगाव येथे सुरू करण्यात आली. पण प्रत्यक्षात या संस्थेने कामच सुरू केले नाही. त्यामुळे मशीनचा वापरदेखील झाला नाही. त्यामुळे मशीन तशीच पडून आहे. देखभालही करण्यात आलेली नाही त्यामुळे यंत्राला गंज चढला आहे. मशीनचे सर्व भाग निकामी झाले आहेत. तसेच नॅपकिन तयार करण्यासाठी खरेदी केलेला कच्चा माल पूर्ण खराब झाला आहे. दरम्यान संबंधित विभागाला खुलासा करण्यास सांगण्यात आले असून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आम्ही गरजू महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देणार आहोत. बंद असलेली मशीन पुन्हा चालू करण्यात येईल. या मशीन सार्वजनिक शौचालय व इतर ठिकाणी लावण्यात येणार आहेत.
कविता बोरकर, (उपायुक्त, महिला बालकल्याण विभाग)