
सरकारने पुरेसे पैसेच न दिल्याने भिवंडी-वाडा रस्त्याचे काम ठेकेदार कंपनीने थांबवले आहे. या कामासाठी 800 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. पण काही काम अपूर्ण असून ते निधीअभावी रखडले आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने भिवंडी-वाडा रस्त्यावर अनेक खड्डेदेखील पडले असून वाहतूककोंडीला रोज सामोरे जावे लागत आहे. लवकरात लवकर सरकारने निधी देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भिवंडी-वाडा रस्ता हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून त्याचा ठेका ‘ईगल’ या कंपनीला देण्यात आला आहे. तानसा पूल ते कुडूसपर्यंतचे काम काही टप्पे वगळता पूर्ण झाले. तर शिरीषपाडा ते वाडा खंडेश्वरी नाक्यापर्यंतचे काही टप्पे वगळता एका बाजूचे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे.
तर दुसरा कंत्राटदार नेमा
काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या आस्ते कदम कारभाराविरोधात संतप्त नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. मात्र आता पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यातच ठेकेदार ‘ईगल’ कंपनीला पैसे न मिळाल्याने गेल्या पाच दिवसांपासून काम बंद ठेवले आहे. सरकारकडे पैसे नसतील तर दुसरा कंत्राटदार नेमावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी केली आहे. प्रशासनाकडे वारंवार फेऱ्या मारूनही आम्हाला कोणी दाद देत नाही. मशीनमध्ये टाकायला डिझेलही नाही. त्यामुळे काम बंद ठेवले आहे.