भूतबाधा झाल्याचे सांगत मायलेकींना डांबून ठेवत सळ्यांचे चटके, यवतमाळमध्ये अघोरी कृत्य

यवतमाळमध्ये भयंकर अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. तुझ्यावर दृष्ट आत्म्याचा प्रभाव पडल्याचे सांगत एका भोंदूबाबाने मायलेकींना खोलीत डांबून ठेवत त्यांना सळ्यांचे चटके दिले. यवतमाळ शहरातील कॉटन मार्केट परिसरात वंजारी फैलात येथे ही घटना घडली. पोलिसांनी भोंदूबाबाच्या तावडीतून मायलेकींची सुटका केली आहे. महादेव परसराम पालवे असे या भोंदूबाबाचे नाव आहे.

गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी भोंदूबाबाच्या घरी धाड टाकली. यावेळी घरातील वातावरण आणि यातनागृह पाहून पोलीसही हादरले. भोंदूबाबाने घरातच बुवाबाजीचे दुकान मांडले होते.

पतीपासून विभक्त राहणाऱ्या नीतू जयस्वाल या महिलेला भोंदूबाबाने आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यावर दृष्ट आत्म्याचा प्रभाव असल्याचे सांगत अघोरी उपचारासाठी तिला स्वतःच्या घरी आणले. महिलेसोबत तिची 14 वर्षांची मुलगीही आली. भोंदूबाबाने पडक्या जागेत पत्र्याची खोली तयार केली आणि या खोलीत मायलेकींना डांबून ठेवले. उपचाराच्या नावाखाली हा भोंदूबाबा मायलेकींना गरम सळीचे चटके देत होता. दोघींच्या अंगावर जखमा आणि मारहाणीचे वळ दिसून आले.

पोलिसांनी मायलेकींची सुटका करत त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दोघींवर लैंगिक अत्याचार झाला आहे का याबाबतही पोलीस तपास करत आहेत. महिलेच्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून भोंदूबाबा विरोधात बाल सरंक्षण आणि जादूटोणा कायद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.