
स्वतःच्या सहा दिवसांच्या बाळाची विक्री करणाऱया आईची मुंबई सत्र न्यायालयाने सुटका केली आहे. सहा दिवसाचे मूल चेंबूर येथे एका संस्थेकडे सुरक्षित असून अर्जदार ही पीडित बालकाची जन्मदाती आई आहे. त्यामुळे तिला आणखी तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मातेचा जामीन अर्ज मंजूर केला.
गोवंडीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑगस्ट 2025 साली एका महिलेने सहा दिवसांच्या नवजात बालकाचा पती व इतर मध्यस्थांच्या मदतीने 5.50 लाखांना सौदा केला. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून नवजात मुलाच्या आईला पोलिसांनी 7 ऑगस्ट 2025 रोजी अटक केली. आपला या प्रकरणाशी काही संबंध नाही. उलट आपले बाळ चोरीला गेले होते असा दावा करत आरोपी आईने सत्र न्यायालयात अॅड. गणेश गुप्ता व अॅड. सूर्या गुप्ता यांच्या वतीने अर्ज दाखल केला त्या अर्जावर अतिरिक्त न्यायाधीश अनिल साळुंखे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले की, याचिकाकर्तीला तीन मुले असून त्यांना आईची गरज आहे, सध्या ही मुले आपल्या नातेवाईकांकडे राहात आहेत सरकारी पक्षाने या युक्तीवादाला विरोध करत जामीन अर्ज फेटाळून लावण्याची मागणी केली. पतीसोबत याचिकाकर्तीने जाणीवपूर्वक हा व्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.
आरोपपत्र दाखल
न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेत राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले आहे. याप्रकरणातील सह आरोपींची जामिनावर यापूर्वीच सुटका झाली आहे. त्यामुळे याचिकाकर्तीला तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने 25 हजारांच्या जातमुचलक्यावर याचिकाकर्तीचा सशर्त जामीन मंजूर केला.




























































