बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरू झाला आणि पहिल्या दिवसापासून घरात वादांना सुरुवात झाली. पहिला आठवडा निक्की तांबोळीच्या उद्धटपणाने गाजवल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात तिची जागा अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने घेतली. जान्हवी संपूर्ण आठवडाभर कुणा ना कुणाशी पंगा घेताना दिसली आहे. विनाकारण भांडण करणं, नको ते बोलणं यामुळे सध्या घरातल्यामध्ये जान्हवीविषयी राग आहेच बाहेर देखील प्रेक्षक जान्हवीवर भडकले आहेत. सोशल मीडियावर तर जान्हवीला घराबाहेर हाकलण्याची मागणी होत आहे.
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनची विजेती मेघा धाडे हिने थेट जान्हवीला घराबाहेर काढा अशी मागणी रितेश देशमुख यांच्याकडे केली आहे. मेघाने तिच्या सोशल मीडियावरून रितेशला टॅग करत जान्हवीला घराबाहेर काढा अशी मागणी केली आहे. ”मला आठवतं हिंदी बिग बॉसमध्ये सलमान खानने प्रियांका जग्गा आणि स्वामी ओम यांना त्यांच्या घाणेरड्या वागणूकीसाठी घराबाहेर काढले होते. तशाच प्रकारची कारवाई जान्हवीवर व्हायला हवी. तिची सह स्पर्धकांसोबतची वागणूक ही अमान्य आहे. रितेश सर कृपया जान्हवी किल्लेकरला घराबाहेर काढा ही विनंती. आम्हाला असं घाणेरडं काही बघायचं नाही”, अशी मागणी मेघा धाडेने केली आहे.
“माझ्या लाडक्या बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनो ही आगाऊ कार्टी जान्हवी नॉमिनेशनला आली तर तिला सोडू नका, तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा. हे कळकळीचं Vote Out अपील आहे माझं.” अशीही एक पोस्ट मेघा धाडेने शेअर केली आहे.