रील्सचा नाद जीवावर बेतला, कालव्याच्या प्रवाहात तरुण वाहून गेला

रील्स बनवण्याच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. रील्स बनवताना तरुण पाय घसरून कालव्यात पडल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बेपत्ता तरुणाचा शोध सुरू केला आहे.

बिहारमधील गोपाळगंज येथे नगर पोलीस स्टेशन परिसरातील तुरकाहा रेल्वे ट्रॅकजवळील गंडक कालव्यात ही घटना घडली. शाहबाज आलम असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी दुपारी शाहबाज मित्रासोबत गंडक कालव्याजवळ रील्स बनवत होता. यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो कालव्यात पडला.

देशभरात सध्या पावसाचा हाहाःकार सुरू आहे. पावसामुळे नदी, नाले, कालवे दुथडी भरून वाहत आहेत. गंडक कालव्यात देखील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. यामुळे कालव्यात पडल्यानंतर शाहबाज पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर स्थानिक पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत तरुणाचा शोध सुरू केला. मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही.