केवळ आधार कार्डच्या आधारे दिलेले जन्म-मृत्यू दाखले बोगस ठरणार

खोटी कागदपत्रे सादर करून राज्यात मोठ्या प्रमाणात जन्म-मृत्यूचे दाखले दिले गेल्याचे समोर आले आहे. इतर कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांची तपासणी न करता केवळ आधारकार्ड पाहून दिलेल्या दाखल्यांचाही त्यात समावेश आहे. असे सर्व दाखले बोगस ठरणार असून ते रद्द करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.

महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक आज जारी केले. महसूल आणि गृह विभागांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची उच्चस्तरीय बैठक आज झाली. त्यात जन्म-मृत्यूच्या बोगस दाखल्यांबाबत सखोल चर्चा झाली. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी सोळा मुद्द्यांच्या आधारे जन्म-मृत्यू दाखल्याची तपासणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

11 ऑगस्ट 2023 नंतरच्या नोंदी तत्काळ रद्द

11 ऑगस्ट 2023 च्या सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरीत केलेले जन्म-मृत्यू नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ज्या प्रकरणांमध्ये केवळ आधार कार्डला पुरावा मानून जन्म-मृत्यू दाखले दिले गेले आहेत, ते आदेश त्रुटीपूर्ण मानले जाणार आहेत.

खोट्या नोंदी आढळल्यास गुन्हा दाखल होणार

जन्म-मृत्यू दाखल्यासाठीचा अर्जातील माहिती आणि आधार कार्डवरील जन्मतारीख यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आधारकार्डवर दाखले घेतलेल्या लोकांनी मूळ प्रमाणपत्र परत केले नाही तर ते रद्द होतील.