Iran USA Israel युद्धाने खेळ बदलला! ना सोने ना डॉलर; गुंतवणूकदारांनी अशी केली कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bitcoin hits 72000 mark: outshines gold as safest asset during iran war

युद्धाच्या काळात गुंतवणुकदारांची मोठी अडचण होत असते. अनेकदा बाजारात गुंतवणूक करण्याऐवजी सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा ओढा असतो. पण यावेळी ही गुंतवणूक सोने किंवा चांदी अशा पारंपारिक ठिकाणी न होता गुंतवणुकदारांनी वेगळा मार्ग स्वीकारून कमाई केल्याचे वृत्त आहे.

इराणवर अमेरिका-इस्रायलचे हल्ले झाले आणि स्टॉक मार्केट कोसळले. जगभरातील शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळत होता. सोन्या चांदीच्या दरात देखील असेच चित्र होते. मात्र अशावेळी बिटकॉइनमधील गुंतवणूक वाढली आणि अनेकांनी बिटकॉइनमधून मोठी कमाई केल्याचे वृत्त आहे.

२८ फेब्रुवारीला इराण युद्ध सुरू झाल्यापासून बिटकॉइनने (Bitcoin) ७२,००० डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. तेल आणि शेअर बाजार कोसळत असताना, बिटकॉइनच्या किमतीत झालेली १० टक्क्यांची वाढ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सामान्यतः युद्धाच्या काळात गुंतवणूकदार सोन्याला प्राधान्य देतात. मात्र, यावेळी बिटकॉइनने सोन्याला आणि अमेरिकन डॉलरलाही मागे टाकले आहे. गुंतवणुकीच्या भाषेत याला आता ‘डिजिटल गोल्ड’ म्हणून पाहिले जात आहे.

इराणवरील पहिल्या हल्ल्यापासून फिडेलिटी आणि आय शेअर्स सारख्या बिटकॉइन फंडांमध्ये १.१ अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक झाली आहे. भू-राजकीय संकट काळात गुंतवणूकदार जोखीम असूनही क्रिप्टोला ‘सेफ हेवन’ (सुरक्षित आश्रय) समजत आहेत.

इतिहासात सोने नेहमीच युद्धाच्या काळात चांगली कमाई करते. गुंतवणूकदार एक सुरक्षित जागा म्हणून सोन्याकडे पाहतात. मात्र, यावेळी अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याची मागणी घटली आहे. सध्या सोने ५,००० ते ५,२०० डॉलर्स प्रति औंस या मर्यादेत स्थिर आहे.

बिटकॉइन जरी रॅली करत असला, तरी अनेक अनुभवी गुंतवणूकदार त्याला अजूनही पूर्णपणे सुरक्षित मानत नाहीत. कारण केंद्रीय बँका सोन्याचा साठा वाढवतात, पण बिटकॉइन खरेदी करत नाहीत. त्यामुळे बिटकॉइनची भूमिका ही गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.

वाढत्या तेलाच्या किमतींमुळे अमेरिकेत महागाई वाढण्याची भीती आहे. अशा स्थितीत फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी असल्याने सोन्यापेक्षा इतर पर्यायांकडे गुंतवणूकदार वळत आहेत.

सूचना: कोणत्या गोष्टीत गुंतवणूक करायची हा वैयक्तिक प्रश्न असून सामना कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचे मार्गदर्शन करत नाही. सामना फक्त जे घडले अथवा घडत आहे त्याचे वार्तांकन करतो.