बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपने केले स्वीकृत नगरसेवक, निर्लज्जपणाचा कळस, नैतिकतेला तिलांजली दिली; तुषार आपटे जामिनावर असतानाही पायघड्या अंथरल्या

साधनशुचितेचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपने सत्तेसाठी काँग्रेस आणि एमआयएमबरोबर युती करून विधीनिषेध गुंडाळून ठेवले असतांनाच आज तर राजकारणातील नैतिककतेला सपशेल तिलांजली देत निर्लज्जपणाचा कळस केला. बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले एका नामांकित शाळेचे सचिव तुषार आपटे यांना भाजपने आज थेट स्वीकृत नगरसेवक केले. न्यायालयीन जामिनावर असलेल्या आपटे यांना  भाजपने पायघडया अंथरुन नगरसेवकपद दिल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

बदलापूरच्या नामांकित शाळेत ऑगस्ट 2024 मध्ये दोन चिमुरडय़ांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद अवघ्या देशात उमटले होते. या प्रकरणातील मुख्य आरोप अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. हे प्रकरण दडपणारे शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवाल आणि आपटे फरार झाले होते. ठाणे क्राईम ब्रँचच्या पथकाने तब्बल 35 दिवसानंतर कर्जतच्या फार्म हाऊसमधून त्यांना अटक केली होती. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात आपटे व कोतवाल यांच्यावर खटला सुरू आहे. बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असतांनाही भाजपने तुषार आपटे यांना बदलापूर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती केल्याने बदलापूरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आपटे यांच्याविरोधात प्रक्षोभ का?

शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन चिमुकलींवर अत्याचार केले. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शाळा आणि पोलिसांकडून पालकांवर दबाव टाकला. चिमुरडींवरील अत्याचाराआधीचे 15 दिवसांचे सीसीटीव्ही फूटेज गायब केले. राज्य सरकार अत्याचाराचे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याने 20 ऑगस्ट रोजी बदलापुरकरानी 12 तास रेल रोको केला. यानंतर न्यायालयानेही सरकारला धारेवर धरले. त्यानंतर शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे, मुख्याध्यपिका अर्चना आठवले यांना सहआरोपी करून पॉक्सो दाखल केला आणि हे प्रकरण एसआयटीकडे वर्ग केले.