
राज्यात सत्ता एकत्र उपभोगणारे भाजप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट हे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मात्र परस्परांवर टीकेची झोड उठवत आहेत. पिंपरी–चिंचवड महापालिकेत भाजपकडून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अजित पवार यांनी शुक्रवारी केला. या आरोपांचा भाजपने तीव्र शब्दांत समाचार घेतला असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पवारांना थेट इशारा दिला की, “आम्ही आरोप करायला लागलो तर त्यांचीच अडचण होईल.”
रवींद्र चव्हाण म्हणाले की, अजित पवार यांनी केलेले वक्तव्य हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेले राजकीय विधान आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ही आशियातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात आम्ही अनेक विकासकामे केली, असा दावा अजित पवार यांनी केला असून भाजपच्या काळात महापालिका कर्जबाजारी झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाविरोधात बोलत आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आरोप–प्रत्यारोप किती आणि कसे करायचे हे त्यांनी आधी ठरवावे. “आम्ही आरोप करायला सुरुवात केली, तर त्यांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.
चव्हाण पुढे म्हणाले की, ही निवडणूक कोण अधिक चांगल्या नागरी सुविधा देऊ शकते आणि विकसित पुण्यासाठी कोणते नेतृत्व आवश्यक आहे, हे ठरवणारी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ‘राक्षसी भूक’ पाहवत नाही, तसेच शहरात लुटारूंची टोळी दिवसा ढवळ्या फिरते, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. या टीकेलाही चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. दरम्यान, 70 हजार कोटी रुपये घोटाळ्यांच्या आरोपांबाबत विचारले असता, चव्हाण यांनी थेट उत्तर देणे टाळले. “काल अजित पवार यांनी केलेल्या आरोपांना जे उत्तर द्यायचे होते ते दिले आहे,” असेही चव्हाण म्हणाले.































































