
भाजप नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाचे होर्डिंग हटवल्याच्या रागातून संतापलेल्या नगरसेवकांनी महापालिकेच्या आयुक्त आयएएस आकांक्षा राणा यांना त्यांच्याच कार्यालयात तब्बल दोन तास ओलीस ठेवले. उत्तर प्रदेशमधील झाशी येथे हा प्रकार घडला आहे. अखेर मोठ्या पोलीस फौजफाट्याच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली असून सत्तेचा माज बरा नव्हे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
झाशीच्या नवाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीकेडी चौकात एका भाजप नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाचे मोठे होर्डिंग लावण्यात आले होते. नगरपालिकेने 9 मार्च रोजी हे होर्डिंग अवैध ठरवत हटवले. ही बातमी समजताच नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट पालिका प्रशासनाशी पंगा घेतला.
मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास भाजपसह अन्य काही पक्षांच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य गेटवर ठिय्या मांडला. नगरसेवकांनी कोणालाही आत किंवा बाहेर जाऊ दिले नाही. यामुळे आयुक्त आकांक्षा राणा आपल्या चेंबरमध्येच अडकून पडल्या. जेव्हा सहाय्यक नगर आयुक्त गौरव कुमार कार्यालयात पोहोचले, तेव्हा आंदोलक नगरसेवकांनी त्यांना परत पाठवले आणि त्यांच्या सरकारी गाडीची चावीही हिसकावून घेतली.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुमारे 2 तासांच्या तणावानंतर पोलिसांनी सुरक्षा कडे करून आकांक्षा राणा यांना कार्यालयातून बाहेर काढले. यावेळी नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भाजप नगरसेवक दिनेश प्रताप बुंदेला यांनी आरोप केला की, नगरसेवक जे प्रस्ताव देतात त्यावर प्रशासन काम करत नाही. आयुक्त मनमानी कारभार करत असून, यामुळे जनतेत आमची प्रतिमा खराब होत आहे. तर दुसरीकडे आकांक्षा राणा यांनी सर्व विकासकामे नियमानुसार केली जात आहेत. कोणाला काही समस्या असल्यास त्यांनी चर्चेसाठी यावे, असे आवाहन आम्ही केले आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
























































