
भाजपची अवस्था ही ‘पिंजरा’ नावाच्या चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. मास्तर तमाशा बंद करायला आले होते, पण मास्तराला तमाशाचा इतका नाद लागला की, तोच तुणतुणे घेऊन पुढे उभा राहिला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी भाजपला सर्वाधिक जागा असूनही वेगवेगळ्या आघाड्या एकत्र करून सत्ता बनवण्याचे नाकारले होते. मात्र आज भाजप काय करतेय? सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसमधील नेत्यांना फोडून पक्षात घेत आहे. काँग्रेसमुक्त भारतचा नारा देणारा भाजप आज स्वतःच काँग्रेसयुक्त झाला आहे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजपच्या पह्डापह्डीच्या राजकारणावर निशाणा साधला.
यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे
भाजप स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेते. मात्र अकोल्यात त्यांनी ज्या एमआयएम आणि ओवेसींवर नेहमी टीका केली, त्यांच्याशीच हातमिळवणी केली आहे. सत्तेसाठी कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसायला यांना काही वाटत नाही. यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, हे आता जनतेने ओळखावे, असे जयंत पाटील म्हणाले.





























































