
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. उद्घाटनाची वेळ 6.30 ची ठरली होती. मात्र, त्यापूर्वीच अजित पवार यांनी उद्घाटन उरकले. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या पोहोचण्यापूर्वीच आणि घोषित वेळेपूर्वी उद्घाटन झाल्याने त्यांनी तक्रारीचा सूर आळवल्याने काल महाराष्ट्र दिनी महायुतीमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळाले.
मेधा कुलकर्णी यांनी या कार्यक्रमामध्येच जाहीरपणे नाराजी व्यक्त करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘हा विषय गमतीने घेत’ मला काय माहीत तुम्ही येणार आहात, असे म्हणत ‘चला परत उद्घाटन करू,’ असे म्हटले. तसेच मेधा कुलकर्णी यांच्यासह पुन्हा इमारतीचे उद्घाटन केले. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीचे उद्घाटन अजित पवार यांनी घोषित वेळेपूर्वी केल्याने खासदार मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त करताना अजित पवारांकडे वेळेच्या आधी उद्घाटन केल्याची तक्रार केली. त्यामुळे माध्यमांपुढे हा विषय चर्चेला आला; मात्र याच वेळी अजित पवार यांनी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पुन्हा उद्घाटन केल्याने वाद थांबला.
मी वेळेच्या आधी 10 मिनिटे त्या ठिकाणी पोहोचले होते. मात्र, त्याच्या देखील आधी दहा-पंधरा मिनिटे लवकर उद्घाटन झालं. यापूर्वी देखील शिवाजीनगर येथील एका उद्घाटनाला आम्ही सकाळी लवकर पोहोचलो होतो, मात्र त्यापूर्वीच अजितदादांनी ते उद्घाटन उरकले होते, असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या. अजित पवार यांनी महामंडळाच्या इमारतीच्या उद्घाटनानंतर सातच्या सुमारास सिंहगडरोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. या वेळी खासदार मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते.
पुण्यात मी एकटीच ब्राम्हण खासदार आहे आणि महाराष्ट्रामधून फक्त दोन ब्राह्मण खासदार आहेत. त्यामध्ये एक लोकसभेमध्ये आणि दुसरे राज्यसभेमध्ये हा विषय त्या विषयाशी निगडित आहे. त्यामुळे परशुराम आर्थिक विकास महामंडळ यासाठी नक्की काम करेल.
– खासदार मेधा कुलकर्णी