
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच्या झालेल्या दारूण पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. तसा प्रस्ताव त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन दिला होता.
दिल्लीत आज झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण, त्याबाबत कोणतीही चर्चा बैठकीत झाली नसल्याने फडणवीस यांना तूर्तास तरी अभय मिळाले आहे. राज्यातील भाजपच्या नेतृत्वात कोणताही बदल करण्यात येणार नाही. महायुती संपूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी कोअर कमिटी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.