सरकारच्या कारभाराविरोधात शिवसेनेचा पावसात ‘रास्ता रोको’, सातारा बस स्थानकाच्या गेटवर आंदोलन

‘लाडकी बहीण’ योजनेचा डांगोरा पिटण्यासाठी जिह्याजिह्यांत होत असलेल्या मेळाव्यांना महिलांची गर्दी जमविण्यासाठी एसटीचा सर्रास वापर केला जात आहे. यामध्ये लाखो प्रवाशांचे नाहक हाल करणाऱ्या तुघलकी कारभाराविरोधात आज साताऱ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भरपावसात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

आज सकाळी साडेअकराच्या सुमारास जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सातारा बस स्थानकाच्या आऊट गेटवर शिवसैनिकांनी ‘रास्ता रोको’ केला. या आंदोलनामुळे बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेस अर्धा तास अडकून पडल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चेला आल्याशिवाय माघार घेणार नाही, असा पवित्रा सचिन मोहिते यांनी घेतल्यामुळे वातावरण तापले.

आठवडाभरापूर्वी साताऱ्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचा डांगोरा पिटण्यासाठी घेतलेल्या मेळाव्यासाठी सातारा जिह्यात जवळपास 400 बसेस वापरल्या गेल्या. त्यामुळे एसटी बसेसच्या दोन हजार फेऱ्या अचानक रद्द झाल्या. त्यामुळे संपूर्ण जिल्हाभर गोंधळ उडाला. नागरिकांची मोठी गैरसोय झाली. मेळाव्यादिवशी फेऱ्या रद्द होणार असल्याबाबत विभाग नियंत्रकांच्या वतीने आधी दोन दिवस प्रवाशांना पूर्वकल्पना द्यायला हवी होती. ती न दिल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. हा एसटीच्या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, त्यावर कारवाई न झाल्यामुळे आज ‘रास्ता रोको’ आंदोलन केल्याचे सचिन मोहिते यांनी सांगितले.

या आंदोलनात सागर रायते, सुनील पवार, प्रणव सावंत, रूपेश वंजारी, शिवराज टोणपे, रवींद्र भणगे, हरि पवार, इम्रान बागवान, अनिल गुजर, सागर धोत्रे, अजय सावंत, तेजस पिसाळ, रवींद्र चिकणे, आझाद शेख, अक्षय वाघमारे, आरिफ शेख, परवेझ शेख, आनंद देशमुख, सुनील मोहिते, सचिन जगताप यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.