बेघरांच्या नजरेतून मुंबईचे खरे दर्शन घडले! ‘माय मुंबई प्रोजेक्ट फोटो’ प्रदर्शनाचे पालिका आयुक्तांकडून कौतुक

मुंबईतील बेघरांनी त्यांच्या दृष्टिकोनातून टिपलेली मुंबईवरील छायाचित्रांच्या ‘माय मुंबई प्रोजेक्ट फोटो’ या प्रदर्शनाचे उद्घाटन पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते मुंबई प्रेस क्लब येथे आज झाले. समाजात दुर्लक्षित असलेल्या बेघरांच्या नजरेतून मुंबईचे खऱ्या अर्थाने दर्शन घडले, अशी दाद भूषण गगराणी यांनी यावेळी दिली. या प्रदर्शनला भेट देणारे रसिक छायाचित्रांमुळे मंत्रमुग्ध झाले.

मुंबईतील छायाचित्रे टिपण्यासाठी ‘पहचान’ या संस्थेने मुंबईतील 50 बेघर नागरिकांची निवड केली होती तसेच त्यांना कॅमेरे देऊन त्यांच्या दृष्टिकोनातून मुंबईची छायाचित्रे टिपण्याची संधी दिली होती. याबाबत त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले होते. निवड झालेल्या 50 जणांनी मिळून 1 हजार 107 छायाचित्रे टिपली. त्या छायाचित्रांपैकी निवडक 40 छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई प्रेस क्लब येथे भरवण्यात आले आहे. यावेळी बेघर निवारा राज्य संनियंत्रण समितीचे अध्यक्ष उज्ज्वल उके, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत नाकवे, ‘पहचान’ संस्थेचे ब्रिजेश आर्य, सार्थक बॅनर्जीपुरी, सुभाष रोकडे उपस्थित होते.

कौतुकास्पद उपक्रम

समाजाकडून दुर्लक्षित घटकांची कला समाजासमोर आणून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी ‘पहचान’ संस्थेने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मुंबईतील बेघर नागरिकांना निवारा मिळावा, त्यांना मूलभूत नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून महापालिका प्रयत्नशील आहे, असे आयुक्त म्हणाले.