अंधेरीत 200 बेकायदा बांधकामांवर पालिकेचा हातोडा, फेरीवाल्यांनाही हटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या के पश्चिम विभागाकडून राम गणेश गडकरी मार्ग (इर्ला मार्ग) परिसरातील सुमारे 200 अनधिकृत फेरीवाले, फुटपाथवरील अनधिकृत वाढीव बांधकामांवर बुलडोझर फिरवून ही बांधकामे हटवली.

अंधेरी पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्ग आणि गुलमोहर मार्गाला जोडून असलेल्या तसेच डॉ. रु.न. कूपर रुग्णालयाच्या प्रवेश मार्गाशी संलग्नित राम गणेश गडकरी मार्गावरील (इर्ला मार्ग) पदपथांवर अनधिकृत वाढीव बांधकामे आढळून आली होती. तसेच या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनीही दुकाने उभी केल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे कूपर रुग्णालयात अणीबाणीप्रसंगी रुग्णांना घेऊन येणाऱया रुग्णवाहिकांना मार्गक्रमण करण्यास तसेच पादचाऱयांना पदपथांवरून चालण्यास अडथळा निर्माण होत होता. पालिका आयुक्त  भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार उप आयुक्त  (परिमंडळ-4) भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. ही अतिक्रमणे हटवण्यासाठी मनुष्यबळासह जेसीबी, आवश्यक सामग्री आणि पोलीस बळ तैनात करण्यात आले होते.