
महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या रणधुमाळीनंतर आता निकालाचा दिवस उजाडला आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी (16 जानेवारी) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मतमोजणी सुरु असताना प्रतिक्रीया देताना ते म्हणाले, अजूनही लढाई संपलेली नाही. पूर्ण निकाल अजूनही आलेले नसताना भाजप मुंबईत जल्लोष करत आहे. दुपारी तीन नंतर यायला लागलेल्या निकालांचे चित्र हळूहळू स्पष्ट होईल.
ही नक्कीच अटीतटीची लढत असून, काटे की टक्कर होणार हे निश्चित. परंतु निकाल हळूहळू स्पष्ट होईल असे मत राऊत यांनी व्यक्त केले. मुंबई बाहेरील महापालिकेमध्ये तुमचा विजय झालेला आहे त्याबद्दल अभिनंदन. मुंबईची लढाई वेगळी आहे ती शेवटच्या श्वासापर्यंत आमच्याकडून लढली जाईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. भाजपकडून ठाकरेंना आव्हान द्यायचा प्रयत्न झाला पण त्याला मर्यादा आहे. ही लढाई संपलेली नाही. निकाल यायला बारा वाजतील त्यानंतर आपण बोलू असे राऊत म्हणाले. याक्षणी लढाई बरोबरीस सुरु आहे.. आणि काहीही होऊ शकतं.
सत्तेच्या आणि पैशांच्या जोरावर भाजपनं जागा जिंकल्या. शिवसेना फुटली नसती तर शिवसेना नक्कीच १२० जागांवर एकटी जिंकली असती. मुंबईवर महापौर बसवण्यासाठी शिवसेना फोडली, मराठी माणसाच्या एकजुटीला सुरुंग लावला. तरीही महाराष्ट्रातील जनता ठाकरे बंधू्च्या मागे ठामपणे उभी आहे असे म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. २३ वर्षे आम्ही मुंबईचा महापौर दिला, २४ वा महापौर देण्याचा आमचे प्रयत्न शेवटपर्यंत सुरु राहतील असे मत राऊत यांनी व्यक्त केले.





























































