मुंबईत निवडणूक प्रक्रियेतील गाड्यांवर पालिकेचा ‘वॉच’, 2 हजार 865 वाहनांचे ‘जिओ ट्रकिंग’; गैरप्रकार टाळण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय

मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांत निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या विविध प्रकारच्या 2 हजार 865 वाहनांवर ‘जिओ ट्रकिंग’च्या माध्यमातून नजर पालिका प्रशासनाकडून ठेवण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले. त्यामुळे वाहने कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास प्रतिबंध राहणार आहे.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार पालिकेच्या माध्यमातून निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये मतदान यंत्रणा, अधिकारी-कर्मचारी यांची सुरक्षित
ने-आण, सुरक्षा आणि मतमोजणीसाठी आवश्यक असलेल्या वाहनांवर कोणताही गैरवापर होऊ नये यासाठी ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वाहतूक शाखेमार्फत विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या कामांसाठी वापरण्यात येत असलेल्या सर्व वाहनांवर ट्रॅकिंग प्रणाली बसविण्यात आली असून ती थेट नियंत्रण कक्षाशी जोडलेली आहे. नेमून दिलेल्या कार्यकक्षेबाहेर वाहन गेल्यास तत्काळ अलर्ट मिळणार असून त्यावर त्वरित कार्यवाही केली जाणार आहे.

कार्यक्षेत्राबाहेर गेल्यास नियंत्रण कक्षालअलर्ट

निवडणूक प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये बेस्टच्या 1,023 बसेस, एसटीच्या 101 बसेस, खासगी 1,160 बसेस आणि 581 टॅक्सींचा समावेश आहे. या सर्व वाहनांचे लाईव्ह लोकेशन, मार्गक्रमणाचा इतिहास आणि जिओ-फेन्स्सिंग अलर्ट यंत्रणेद्वारे निरीक्षण केले जाणार आहे. कोणतेही वाहन संबंधित निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्राबाहेर गेल्यास तत्काळ नियंत्रण कक्षाला ‘अलर्ट’ मिळणार आहे. यासाठी नियंत्रण कक्षात 3 अभियंते व 3 ऑपरेटर यांची 8-8 तासांच्या सत्रांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.