
वर्सोवा–भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पासाठी अंधेरीतील सात बंगला परिसरातील नाना-नानी पार्कमध्ये 184 झाडे तोडण्याचा आणि आणखी 164 झाडे पुनर्लागवडीसाठी हलवण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेने मांडला आहे.
2001 साली स्थापन झालेले हे उद्यान अंधेरी–वर्सोवा परिसरातील ज्येष्ठ नागरिक, मुले आणि रहिवाशांसाठी महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण मानले जाते. उद्यानातील झाडांवर लावलेल्या नोटीसनुसार, प्रभावित भाग वर्सोवा इंटरचेंज ते अंधेरीतील बांगूर नगरदरम्यान आहे. महानगरपालिकेने झाडतोड आणि पुनर्लागवडीच्या प्रस्तावावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 18 फेब्रुवारीपर्यंत याबाबत मते नोंदवता येणार असून त्यानंतर सार्वजनिक सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
विकास विरुद्ध पर्यावरणाचा वाद
या प्रस्तावावर स्थानिक नागरिकांमध्ये भिन्न प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्यानात नियमित फेरफटका मारणारे 75 वर्षीय जयंत संपत यांनी झाडतोड दुर्दैवी असली, तरी शहराच्या विकासासाठी आवश्यक असल्यास ती स्वीकारावी, असे मत व्यक्त केले. “शहराच्या भल्यासाठी विकास थांबवता येणार नाही. गरज असल्यास झाडे दुसरीकडे हलवता येऊ शकतात,” असे त्यांनी सांगितले.
मात्र काही नागरिकांनी विकासाला विरोध नसून तो शाश्वत आणि स्थानिक गरजांचा विचार करून व्हावा, अशी भूमिका घेतली आहे. दीर्घकाळापासून उद्यानात येणाऱ्या अर्चना जामदार म्हणाल्या, “हे उद्यान म्हणजे रिकामी जमीन नाही. येथे ज्येष्ठ नागरिक, मुले आणि पक्षी येतात. ही झाडे अनेक दशकांत वाढली आहेत. ती एकदा गेली, तर ती परिसंस्था पुन्हा लगेच तयार होऊ शकत नाही.”
श्रीश जामदार यांनीही स्थानिकांच्या जीवनमानाला प्राधान्य देण्याची मागणी केली. “फक्त काही मिनिटांचा प्रवास वेगवान करण्यासाठी स्थानिक रहिवाशांच्या गरजांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. झाडे तोडणे सोपे असते, पण शहराच्या हवेच्या गुणवत्तेवर त्याचा मोठा परिणाम होतो,” असे ते म्हणाले.
पर्यावरणवाद्यांची नाराजी
पर्यावरण कार्यकर्त्यांनी विशेषतः 164 झाडांच्या पुनर्लागवडीच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला आहे. ‘सेव्ह आरे’ आंदोलनाचे कैलाश अन्नेराव यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एका ठिकाणी झाडे तोडून दुसऱ्या ठिकाणी लावणे ही मोठी फसवणूक आहे. त्या ठिकाणीच त्या झाडांची गरज असते. दिलेल्या आश्वासनांचे पालन न झाल्यास जबाबदारी कोणाची, याचे उत्तर नसते,” असे त्यांनी सांगितले.





























































