
अलिबागच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री उरणच्या मोरा जेट्टीजवळ कामगारांची बोट उलटली. त्यात एकाचा मृत्यू झाला असून पाचजण कसेबसे बचावले आहेत. या बचावलेल्या कामगारांनी जीवावर उदार होऊन पोहत समुद्रकिनारा गाठला. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लवकरच मच्छीमारीला सुरुवात होणार असल्याने मोरा बंदरात बोटींची डागडुजी, रंगरंगोटी व अन्य कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. मासेमारी सुरू होण्यापूर्वी कोळीबांधवांना त्यांच्या होड्या सज्ज ठेवाव्या लागणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर होडींची दुरुस्ती मोरा-भाऊचा धक्का तसेच रो-रो सेवेच्या जेट्टीजवळ सुरू आहे. त्यासाठी कामगार रोज होडीने जातात. शनिवारी दिवसभर दुरुस्तीचे काम करून काही कामगार बोटीने किनाऱ्याकडे परतत होते.
वादळी वारे आणि मुसळधार पाऊस
कामगारांना घेऊन जाणारी छोटी बोट अचानक वादळी वारे आणि मुसळधार कोसळणारा पाऊस याच्या कचाट्यात सापडली आणि जेट्टीच्या जवळच उलटली. बोटीतील पाच कामगारांना पोहता येत असल्यामुळे ते सर्वजण सुखरूप किनाऱ्यावर परतले. मात्र सुरेश गौतम (२२) याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी त्याचा मृतदेह समुद्रात तरंगताना आढळला. पोलि सांनी तो ताब्यात घेतला असून नातेवाईकांकडे सुपूर्द केला आहे.
सुरक्षा रामभरोसे
उरण परिसरात बोटींची दुरुस्ती करणारे अनेक कारागीर आहेत. मासेमारी सुरू होण्यास थोडाच कालावधी शिल्लक असल्याने सध्या त्यांची कामे जोरात सुरू आहेत. समुद्रकिनारी किंवा जेट्टीजवळ बोटींची दुरुस्ती करताना कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून आले आहे.