चूक केली तर कारवाई करावी लागेल, अल्लू अर्जुनच्या अटकेवर नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया

‘पुष्पा 2’ च्या प्रिमिअरवेळी झालेल्या चेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याने साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली. यानंतर कनिष्ठ न्यायालयाने अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र तेलंगणा हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती देत अल्लू अर्जुनला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चूक झाली तर अटक व्हायलाच पाहिजे असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले नाना पाटेकर?

अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर सोशल मीडियावर कलाकर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील दमदार तसेच आपल्या स्पष्टवक्त्या स्वभावासाठी ओळखले जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. जर चूक झाली असेल तर शिक्षा व्हायला पाहिजे. जर माझ्यामुले दुर्घटना झाली तर मलाही अटक व्हायला पाहिजे. चूक नसेल तर अटक व्हायला नको, असे नाना पाटेकर म्हणाले.

अभिनेता प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेऊ शकत नाही – वरुण धवन

अभिनेता वरुण धवन यानेही अल्लू अर्जुनच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वत्र सुरक्षा प्रोटोकॉल आवश्यक असल्याचे स्पष्ट करत अभिनेता प्रत्येक गोष्टी जबाबदारी घेऊ शकत नाही, असे वरुण धवन म्हणाला. संध्या चित्रपटगृहाबाहेर घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे. पीडित कुटुंबाप्रती मी संवदेना व्यक्त करतो. मात्र अपघात प्रकरणी एकाच व्यक्तीला जबाबदार धरणे चुकीचे आहे, असे वरुण पुढे म्हणाला.