
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मुंबई पोलीस, बॉम्बशोध पथक आणि अन्य सुरक्षा एजन्सींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान दोन्ही ठिकाणी कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोद सुरू केला आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी लागोपाठ तीन कॉल आले. अज्ञाताने विमानतळावर बॉम्ब ठेवला आहे, थोड्याच वेळात मोठा स्फोट होणार असे फोनवर सांगितले. या फोननंतर विमानतळावर एकच धावपळ उडाली. यानंतर तात्काळ सुरक्षा यंत्रणांना याबाबत माहिती देण्यात आली. अनेक तास विमानतळावर तपास मोहिम राबवण्यात आली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
यानंतर शनिवारी सकाळी महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयात अज्ञात व्यक्तीने फोन करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. यानंतर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले. मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, बॉम्बशोधक पथकाने सीएसएमटी स्थानकात दाखल होत शोध मोहिम सुरू केली.
सुमारे दोन तास स्थानकात शोधमोहिम राबवण्यात आली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अज्ञाताविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली असून सीसीटीव्ही निरीक्षण देखील वाढवले आहे.