पत्नीच्या हत्येचा खटला तीन वर्षे रेंगाळला, हायकोर्टाकडून पतीला जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नीला इंजेक्शन देऊन ठार केल्याचा आरोप असलेल्या पतीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या पतीविरोधातील खटला तीन वर्षे रेंगाळल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला. अ‍ॅड. सिद्धांत देशपांडे व अ‍ॅड. अभिषेक अवचट यांच्यामार्फत या पतीने जामिनासाठी याचिका केली होती. न्या. शिवकुमार डिगे यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. गेली तीन वर्षे पती कारागृहात आहे. खटल्यात काहीच प्रगती झालेली नाही. त्याला जामीन मंजूर करायला हवा, अशी मागणी अ‍ॅड. देशपांडे यांनी केली.

पोलिसांनी या जामिनाला विरोध केला. पती आयसीयू विभागाचा प्रमुख होता. त्याने दिलेल्या इंजेक्शनमुळे पत्नीचा मृत्यू झाला. जामीन मंजूर झाल्यास पती पुराव्यांशी छेडछाड करू शकतो. साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो. त्यामुळे जामीन मंजूर करू नये, असा दावा पोलिसांनी केला. तो अमान्य करत न्यायालयाने या पतीला 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

पोलीस ठाण्यात हजेरी लावावी

पोलिसांनी समन्स दिल्यानंतर पतीने पोलीस ठाण्यात हजेरी लावावी. पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशी अट न्यायालयाने घातली. सत्र न्यायालयाने पुराव्यांच्या आधारावर संबंधित खटल्याचा निकाल द्यावा, असेही न्या. डिगे यांनी नमूद केले.