
श्रावण महिन्यात मांस, मटण, मच्छी निषिद्ध मानण्यात आली असली तरी उरणच्या बाजारपेठेत सध्या बोंबलाचा खमंग दरवळत आहे. मासेमारी सुरू होताच आवक वाढली असून दोनशे रुपये प्रति वाट्याचा दर थेट 50 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे खवय्यांच्या बोंबलावर उड्या पडत असून श्रावणात आता खमंग बोंबील दरवळला.. असे गुणगुणण्याची वेळ आली आहे.
बाजारपेठेतही आवक अतिशय कमी झाली. या काळात कर्नाटक, ओरिसा, केरळ, आंध्र प्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल या राज्यातून उरणच्या बाजारात विविध प्रकारची मासळी विक्रीसाठी उपलब्ध होत होती. मात्र परराज्यातून येणाऱ्या पापलेट, सुरमई, कोळंबी, जिताडा, रावस, रिबन फिश, बांगडा, पाला, हलवा, माकुल, बोंबील, हेखरू, ढोमा, कुपा, शिंगाडा या प्रकारातील मासळीचे भाव गगनाला भिडले होते.
बॉम्बे डक नावाने ओळखल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या बोंबलांचे दर (वाटा) असे होते. हे दर नंतर दोनशे रुपयांवर जाऊन पोहोचले. सध्या स्थानिक बाजारात ताज्या बोंबलांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वाट्याचे दर 200 रुपयांवरून थेट 50 रुपयांपर्यंत घसरले आहेत. श्रावणात दर कमी झाल्याने बाजारात गडगडीत, फडफडीत, रुचकर आणि स्वस्तात मिळणाऱ्या ताज्या बोंबलांच्या खरेदीसाठी खवय्यांच्या उड्या पडत आहेत.
पाटीचा दर एक ते दीड हजार
खुल्या बाजारात बोंबलाचा दर पूर्वी प्रति पाटी 3 हजार 500 रुपये होता. आता स्थानिक मच्छीमारांकडून बाजारात येणाऱ्या बोंबलांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने प्रति पाटीचा दर 1 हजार ते 1 हजार 200 पर्यंत येऊन ठेपला असल्याची माहिती व्यावसायिक रमेश नाखवा यांनी दिली.