अभिप्राय- पॅरिसचे विलोभनीय दर्शन

>> राहुल गोखले

जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे व निसर्गसौंदर्यामुळे पर्यटक तेथे आकृष्ट होत असतात. फ्रान्सची राजधानी पॅरिस हे पर्यटकांचे लाडके शहर. पॅरिसला अनेक वेळा जाऊन आलेल्या आणि त्यामुळे त्या शहराचे अंतरंग पाहण्याची संधी मिळालेल्या प्रा. माधुरी शानभाग यांनी ‘वाटेवरचे गाव : मला उमगलेले पॅरिस’ या पुस्तकात पॅरिसचे मनोहारी दर्शन शब्दांतून घडविले आहे. ते इतके प्रत्ययकारी आहे की, वाचकाला पॅरिसची सैर घडेल यात शंका नाही. पॅरिस म्हटले की, पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतो तो आयफेल टॉवर. या मनोऱयाची रंजक माहिती लेखिकेने दिली आहे. पॅरिस हे ऐतिहासिक वास्तूंचे शहर आहे तसेच ते संग्रहालयांचेही शहर आहे.

पॅरिसमध्ये शंभरहून अधिक विविध विषयांना वाहिलेली संग्रहालये आहेत; त्यामुळे पॅरिसला लेखिका म्युझियमचे गाव म्हणते. पॅरिसची नगररचना करताना तेथील चर्चच्या आवारातील कबरी खोदून तेथील हाडे-कवटय़ा यांचीही सुंदर रचना करण्याचा विचार अठराव्या शतकात पॅरिसच्या प्रशासकांनी केला. थडग्यांनादेखील कसे सौंदर्य प्रदान करावे हे पॅरिसकडून शिकावे. शिल्प, बगिचे, सांस्कृतिक वारसा असणाऱया वास्तू, राजवाडे, कारंजी, पुतळे हे एकीकडे आणि दुसरीकडे फॅशनचे कपडे, दागिने यांच्या प्रचंड शोरूम अशा पॅरिसचे बहुरंगी दर्शन तसेच रात्रीचे पॅरिस कसे दिसते याचेही वर्णन लेखिका करते. आधुनिकता स्वीकारताना शहराचे सौंदर्य टिकविणे आणि वारसा जतन करणे जितके आवश्यक तितकीच नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची. पारिसच्या लोकप्रियतेचा उलगडा प्रस्तुत पुस्तकातून होतो.

वाटेवरचे गाव : मला उमगलेले पॅरिस

लेखक : प्रा. माधुरी शानभाग

प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, मुंबई

पृष्ठे: 156   मूल्य : रुपये 280