बोरिवली आरटीओ दहिसरच्या एमटीएनएल इमारतीत हलवणार

मुंबई पश्चिम उपनगरातील बोरिवली आरटीओ कार्यालय नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कांदरपाडा येथे असणाऱ्या जुन्या कार्यालयाचा करारनामा 31 मे रोजी संपुष्टात आला असून त्यामुळे हे कार्यालय आता नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. दहिसर चेकनाक्याजवळील एमटीएनएलच्या कार्यालयात नवे कार्यालय सुरू करणार असून गृह विभागाने या नव्या कार्यालयाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

राज्य परिवहन विभागाचे प्रादेशिक परिवहन कार्यालय हे बोरिवली येथील कांदरपाडा येथे कार्यरत आहेत. 2015 पासून या ठिकाणी हे कार्यालय कार्यरत आहेत. या कार्यालयाचा करारनामा 31 मार्च 2025 रोजी संपुष्टात आला असून आता हे कार्यालय नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यानुसार दहिसर चेकनाक्याजवळील एमटीएनल येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. तब्बल 12300 चौरस फूट जागेवर हे नवीन कार्यालय असणार असून ही जागासुद्धा भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. त्यानुसार प्रतिमहिना 26 लाख 58 हजार इतक्या भाडय़ाला गृह विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.