
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतनमध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्रामदेवता चिंचबादेवी सहा दिवसांच्या पाहुणचारानंतर पुन्हा माहेरी आली. आठ दिवस चाललेल्या या उत्सवाची सांगता चिंचबादेवीच्या पालखी सोहळ्याने झाली. या पालखी सोहळ्यात बोलींपंचतनसह परिसरातील भाविक आणि मुंबई, ठाण्यातील चाकरमानी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. पालखीच्या रस्त्यावर महिलांनी दूध शिंपडले तर देवीचा नवस फेडण्यासाठी माहेरवाशिणींची मोठी गर्दी झाली. शिमगोत्सवादरम्यान म्हशाचे सोंग विशेष आकर्षण ठरले.
होळी पौर्णिमेपासून बोर्लीपंचतनमध्ये हा पारंपरिक आणि प्रसिद्ध शिमगोत्सव सुरू झाला होता. या उत्सवाची सांगता चिंचबादेवीच्या निरोप पालखी मिरवणुकीने भावपूर्ण वातावरणात करण्यात आली. परंपरेनुसार धुलीवंदनाच्या दिवशी चिंचबादेवी पालखीतून आपल्या मुख्य मंदिरातून म्हणजेच ‘सासर’हून होळीवरील मंदिरात म्हणजेच ‘माहेरी’ आली. देवीच्या या आगमन सोहळ्याला गावात विशेष धार्मिक महत्त्व आहे. गावातील पालखी मार्गावरील संपूर्ण रस्त्यावर महिलांनी दूध शिंपडले. प्रत्येक घरात देवीची विधिवत पूजा केली गेली. देवीच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
शिमगोत्सवाच्या कालावधीत होळीवरील सभामंडपात रात्री विविध समाजाच्या वतीने नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम परंपरा बोलींपंचतनच्या लोकसंस्कृतीचे आणि आगरी तसेच पारंपरिक कला सादर केल्या गेल्या. अखंड आगरी समाजाच्या वतीने सादर करण्यात येणारे पारंपरिक व प्रसिद्ध ‘म्हशाचे सोंग’ हे शिमगोत्सवाचे खास आकर्षण ठरले. ही सोंगे पाहण्यासाठी गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिमगोत्सवातील ही आगळीवेगळी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक मानली आहे.
शिमगोत्सवाच्या सांगता दिवशी सायंकाळी चिंचबादेवीची निरोप पालखी गावातून वाजतगाजत काढण्यात आली. गुलालाच्या उधळणीत आणि देवीच्या जयघोषात निघालेल्या या पालखी मिरवणुकीने संपूर्ण गाव दुमदुमून गेले. गावातील प्रमुख ठिकाणी पालखीचे पूजन करून देवीला भावपूर्ण निरोप देण्यात आला.



























































