
प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरीत सुरू असलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक राज्यस्तरीय स्थानिक पुरुष कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत चढाया-पकडींचा अक्षरशः स्पह्ट पाहायला मिळाला. दमदार खेळ करत नाशिकचा ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब आणि रत्नागिरीचा वाघजाई क्रीडा मंडळ या संघांनी मुंबईकर प्रतिस्पर्ध्यांना चिरडत उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचबरोबर मुंबई शहरचा एसएसजी फाऊंडेशन आणि पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अॅपॅडमी यांनीही जोरदार विजय नोंदवत अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवले.
आता अंतिम फेरीच्या तिकिटासाठी ब्रम्हा विरुद्ध पार्ले महोत्सव आणि वाघजाई विरुद्ध एसएसजी अशा दोन थरारक उपांत्य लढती रंगणार आहेत. या दोन्ही लढतींतील विजेते संघ रात्री उशिरा जेतेपदासाठी आमनेसामने भिडणार असल्याने कबड्डीप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱया ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबने विजय क्लबचा अक्षरशः धुव्वा उडवला. प्रफुल झवरे, आकाश शिंदे, स्वयम मालोदे आणि रत्नेश पाटील यांच्या चपळ चढाया आणि अचूक पकडींनी ब्रम्हाने मध्यंतरालाच 29-11 अशी मोठी आघाडी घेतली. ब्रम्हाच्या वेगवान खेळापुढे विजय क्लब पूर्णपणे हतबल झाला. अखेर सामना वेळेपूर्वीच संपवत ब्रम्हाने 38-11 अशा दणदणीत फरकाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दुसऱया उपांत्यपूर्व लढतीत वाघजाई क्रीडा मंडळाने गोल्फादेवी स्पोर्ट्स क्लबला अक्षरशः नामोहरम केले. अभिषेक भोजने, अजिंक्य पवार, शुभम शिंदे आणि साईराज कुंभार यांच्या झंझावाती खेळामुळे वाघजाईने मध्यंतरालाच 21-11 अशी आघाडी घेतली. त्यानंतर वाघजाईच्या आक्रमणासमोर गोल्फादेवीचा बचाव कोसळला आणि वाघजाईने 40-15 अशा दमदार विजयासह उपांत्य फेरी गाठली.
दिवसातील सर्वात रोमहर्षक सामना ठरला तो अंकुर स्पोर्ट्स क्लब आणि एसएसजी फाऊंडेशन यांच्यातील. सुशांत साईल आणि सूरज दाबेकर यांच्या सुसाट खेळामुळे अंकुरने पहिल्या दहा मिनिटांतच 14-3 अशी जबरदस्त आघाडी घेतली होती. मध्यंतरालाही अंकुर 24-13 असा आघाडीवर होता. मात्र उत्तरार्धात प्रो सुपरस्टार पंकज मोहिते मैदानात उतरला आणि सामन्याचे चित्रच पालटले. त्याच्या एकापाठोपाठ एक भन्नाट चढायांनी एसएसजीला अवघ्या दहा मिनिटांत 32-24 अशी आघाडी मिळवून दिली. 11 गुणांनी पिछाडीवर असलेला एसएसजी अचानक आक्रमक झाला आणि 42-29 अशा फरकाने उपांत्य फेरीत धडक मारली. पंकजने 16 गुणांची कमाई करत अक्षरशः वन-मॅन आर्मीचा खेळ साकारला.
दुसरीकडे पार्ले महोत्सव स्पोर्टस अॅकॅडमीने स्वस्तिक क्रीडा मंडळावर 37-28 असा प्रभावी विजय मिळवला. पार्ले महोत्सवच्या विजयात अक्षय तावडेने 14 गुणांची दमदार कमाई करत संघाला विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचवले. स्वस्तिककडून अमित चव्हाण आणि अशोक विटकर यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण पार्ले महोत्सवच्या आक्रमणासमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.



























































