मुंबई महापालिकेचा इशारा : निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास फौजदारी कारवाई

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल 75 हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यापैकी सुमारे 58 हजार कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले असून त्यांचे प्रशिक्षण 29 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. निवडणुकीसंबंधित कामाच्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध मुंबई महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मुंबई महापालिकेची व्याप्ती मोठी असून एकूण 227 प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तब्बल 10 हजारांहून अधिक मतदान केंद्रे असतील. यासाठी मुंबई महापालिकेला मोठ्या प्रमाणात कर्मचारी लागणार आहेत.