
भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरून जम्मूत घुसण्याचा सात दहशतवाद्यांचा डाव बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाने उधळून लावला. बीएसएफच्या कारवाईत हे दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाकिस्तानातील एक रेंजर्स चौकी उद्ध्वस्त करण्यात आली.
गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सांबा जिह्यात पाक चौकीवरून गोळीबार होऊ लागला. त्याआडून हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. पाकिस्तानी रेंजर्स चौकी असलेल्या धांधारवरून हा गोळीबार होत असल्याचे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावत किमान सात दहशतवाद्यांना ठार मारले आणि धांधार चौकी उद्ध्वस्त केली.
पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवर पुपवाडा, उरी, आरएसपुरा, बारामुल्लासह अनेक सेक्टर्समध्ये सातत्याने गोळीबार आणि तोफगोळय़ांचा मारा सुरूच आहे. या गोळीबारात नियंत्रण रेषेवरील गावांतील अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 17 निष्पाप हिंदुस्थानींचा बळी गेला असून 50 हून अधिक जखमी झाले आहेत.
बीएसएफने पाक चौकी आणि बंकरची थर्मल इमेजर क्लिप शेअर केली आहे. रेंजर्सची मोठी मशीनगन या ठिकाणी बसविण्यात आली होती.
अनेकांनी घरे सोडली
पाकिस्तानच्या गोळीबारामुळे अनेक लोकांनी घरे सोडली. एलओसीजवळील बालाकोट, मेंढर, मनकोट, पृष्णा घाटी, गुलपूर, केरनी आणि पूँछ जिह्यात पाकिस्तानी सैन्याने तोफगोळय़ांचा मारा केला. यात डझनभर घरांचे आणि वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.