चुनाभट्टी येथे भीमसैनिक आणि पोलिसांत संघर्ष! रिक्षा अडवल्याने वादाची ठिणगी पडली…

चैत्यभूमीच्या दिशेने निघालेल्या अनुयायांच्या रिक्षा वांद्रे आणि चुनाभट्टी येथे पोलिसांनी अडविल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता. रिक्षांना मुंबई शहरात नेण्यास परवानगी नाही असे म्हणत पोलिसांनी अनुयायांच्या रिक्षा रोखल्या. तर प्रत्येक वर्षी आम्ही रिक्षा घेऊन येतो मग याचवेळी नियम का दाखवता, असे म्हणत अनुयायांनी चुनाभट्टी येथे तीन तास तर वांद्रे येथेदेखील काही काळ रास्ता रोको केला. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

अनुयायी आक्रमक झाले असताना पोलीस त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने दोन तास शीवमध्ये गोंधळ उडाला होता. अखेर वरिष्ठ अधिकाऱयांनी बेस्ट बसेस उपलब्ध करून देत मध्यम मार्ग काढल्याने अनुयायी रिक्षा तेथेच पार्क करून चैत्यभूमीच्या दिशेने मार्गस्थ झाले.

यावेळीच नियम का ?

शहरात रिक्षांना नेण्यास परवानगी नाही असे म्हणत पोलिसांनी अनुयायांच्या रिक्षा रोखून धरल्या. तेव्हा आम्ह़ी प्रत्येक वर्षी 6 डिसेंबरला रिक्षाने येतो. याआधी आम्हाला अशा प्रकारे कधी नियम दाखवत रोखले नव्हते. आम्ही भाडे घेऊन जात नसून कुटुंबासह अभिवादन करण्यासाठी जात आहोत. तेव्हा आजचा दिवस जाऊ द्यावे अशी विनंती अनुयायी करत होते; परंतु पोलीस भूमिकेवर ठाम असल्याने अनुयायांनी तीन तास रास्ता रोको केला.

वांद्रे पश्चिमेलादेखील संतापाचे वातावरण

चुनाभट्टी येथील प्रकरण मिटत नाही तोच पोलिसांनी वांद्रे पश्चिमेकडेदेखील अनुयायांच्या रिक्षा दादरच्या दिशेने जाऊ देण्यास मज्जाव केला. त्यामुळे वांद्रय़ातदेखील संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे धारावी, शीव, चुनाभट्टी आदी परिसरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते.

पोलिसांचा आडमुठेपणा कशासाठी?

अनुयायी मिळेल त्या वाहनाने महामानवास अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेने जातात. अनेक जण अनुयायांसाठी जेवण, पाणी, खाद्यपदार्थ रिक्षातून नेतात. काही अनुयायी ज्यांच्या रिक्षा आहेत तेच कुटुंबाला घेऊन अभिवादन करण्यासाठी जात होते. मग त्यांना अडविण्याची आवश्यकता काय होती? हे जाणीवपूर्वक करण्यात आले का, असा प्रश्न खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी उपस्थित केला.