
निसर्गाचे वरदान लाभलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत कोणतेही बांधकाम होऊ नये, यासाठी भलीमोठी संरक्षक भिंत बांधण्यात आली. या भिंतीपासून काही विशिष्ट अंतरापर्यंतचा परिसर मोकळा राहावा, यासाठी केंद्र सरकारने कायदाही केला, पण सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून मोठमोठे रिसॉर्ट्स, निवासी गृहसंकुले, हॉटेल्स बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. संरक्षक भिंतीलगतच्या जमिनीवर बिल्डर लॉबीचा डोळा असून त्यासाठी प्रारूप मास्टर झोन आराखडा तयार केला आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालाच धोका निर्माण झाला असून वन्यजीव, प्राणी आणि वनसंपदा धोक्यात येणार आहे. दरम्यान, या आराखड्यास मीरा-भाईंदरमध्ये ४८ हरकती घेण्यात आल्या आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार महापालिका क्षेत्रातून जाते. त्या ठिकाणी मास्टर झोन आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. बफर झोनची मर्यादा फक्त १०० मीटरची करण्यात आली आहे. याही क्षेत्रात हॉटेल्स, रिसॉर्ट्स व टोलेजंग इमारती बिल्डरांना बांधता याव्यात यासाठी प्रारूप नगरनिवास विभागामार्फत मास्टर झोन आराखडा तयार केला आहे.
आराखड्याला मीरा-भाईंदरवासीयांनी ठाम विरोध केला असून महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे ४८ हरकती नोंदवल्या आहेत. त्यावर सुनावणी होऊन सर्व सूचना व हरकती सरकारकडे पाठवल्या आहेत.
मीरा-भाईंदर पालिका हद्दीतील मौजे महाजनवाडी हे गावच प्रारूप मास्टर झोन आराखड्यातून वगळले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ डोंगर फोडून तसेच झाडे तोडून पर्यावरणाचे प्रचंड नुकसान केले आहे. बिल्डर व धनदांडग्या लोकांना रान मोकळे करून देण्यासाठी हा प्रारूप मास्टर झोन प्लॅन आणला आहे. तो त्वरित रद्द करून संजय गांधी उद्यानाचे पर्यावरण वाचवावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.





























































