
शिरसोली रस्त्यावरील मोहाडी शिवारात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या घरांवर महापालिकेने चालवलेल्या बुलडोझरचे पडसाद जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात उमटले. आपल्या हक्काच्या निवाऱयासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना घेराव घालणाऱया आदिवासींच्या प्रश्नावर उत्तर देण्याचे सोडून, मंत्री यांनी चक्क पत्रकारांवरच आपला संताप काढला. ‘माफी मागतो, तुमचे पाय पडतो, पण बोलणार नाही,’ अशा शब्दांत पत्रकारांना झिडकारत मंत्री अशोक उईके आल्यापावली निघून गेले.
शिरसोली रोडवरील मोहाडी शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव झोपडय़ा बांधून वास्तव्यास आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने या झोपडय़ांवर कारवाईचा बडगा उगारला होता. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बेघर होण्याच्या भीतीने धास्तावलेले हे नागरिक आदिवासी विकास मंत्री अशोक उईके जळगाव दौऱयावर असताना त्यांना भेटण्यासाठी अजिंठा विश्रामगृहात पोहोचले. यावेळी संतापलेल्या आदिवासी बांधवांनी मंत्र्यांच्या गाडीला घेराव घालत आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.
आदिवासी बांधवांनी घातलेल्या घेरावानंतर मंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा तर केली. मात्र जेव्हा प्रसारमाध्यमांनी या संवेदनशील विषयावर त्यांची अधिकृत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मंत्री अशोक उईके यांचा संयम सुटला. चर्चेचा तपशील विचारला असता मंत्री उईके यांनी उत्तर देण्याऐवजी थेट पत्रकारांवरच आगपाखड केली. ’नाही सांगितल्यावर पण प्रतिक्रिया घेता, तुमची माफी मागतो, तुमचे पाया पडतो,’ असे उपरोधिक आणि संतापजनक उत्तर देत त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले.
जळगावातील आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्याऐवजी मंत्री उईके यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पत्रकारांना हात जोडून आणि कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट न करताच ते विश्रामगृहातून तडकाफडकी निघून गेले. सरकार आदिवासींच्या पाठीशी असल्याचे दावे केले जात असताना प्रत्यक्ष कृती करण्याच्या वेळी मंत्र्यांनी घेतलेली ही माघार आणि पत्रकारांवर काढलेला राग आता चर्चेचा विषय ठरत आहे.































































