दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फुटणार, भायखळ्यातील पुलाचे 80 टक्के काम पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळा येथील अत्याधुनिक केबलस्टेड पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून हा पूल पावसाळय़ापूर्वी वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (महारेल) जाहीर केले आहे. नव्या पुलामुळे वाहनचालकांना दक्षिण मुंबईतील वाहतूक काsंडीपासून दिलासा मिळणार आहे.

महारेल आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या माध्यमातून भायखळा केबल-स्टेड पुलाचे काम केले जात आहे. हा पूल 916 मीटर लांब आणि चार मार्गिकांचा आहे. जुन्या पुलाच्या तुलनेत दुप्पट रुंदी असल्याने नवा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबईकरांच्या दक्षिण मुंबईतील रस्ते प्रवासाला गती मिळणार आहे. भायखळा रेल्वे स्थानकाजवळ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱया भायखळा रोड ओव्हरब्रिजचे आयुर्मान संपले होते. त्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक केबल-स्टेड पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. 287 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला हा पूल विविध अर्थाने वैशिष्टय़पूर्ण असून मुंबईकरांच्या आकर्षणाचा पेंद्रबिंदू ठरणार आहे. पुलावर रिमोट-नियंत्रित आर्किटेक्चरल एलईडी लायटिंग असेल. तसेच सेल्फी पॉइंटची व्यवस्था असल्याने मुंबईकरांना पुलावर हजेरी लावून संस्मरणीय क्षण पॅमेऱयात टिपता येणार आहेत.