
महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील गृहकलह समोर आला आहे. आमदार शंकर जगताप यांनी दिलेला उमेदवार हा ‘नमकहरामी’ आहे असे स्टेटस भाजपच्या माजी आमदार आणि शंकर जगतापांच्या वहिनी अश्विनी जगतापांनी ठेवले आहे. जगताप यांनी भाजपचे उमेदवार माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर जगतापांना उद्देशून हे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्याची चर्चा आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग 31 मधून भाजपच्या वतीने माऊली जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माऊली जगताप यांनी सोशल मीडियावर गुलालात माखलेल्या स्वतःच्या पह्टोसह एक पोस्ट केली. या पोस्टमुळे माजी आमदार अश्विनी जगताप यांचा पारा चढला. त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये लक्ष्मण भाऊंच्या छत्रछायेखाली तू तयार झालास, तेव्हा तू भाऊंच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास? अशी पोस्ट केली. माऊली जगताप भाऊंच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होता? असा प्रश्न वहिनींनी दीर शंकर जगतापांच्या निमित्ताने उपस्थित केलाय का? कारण लक्ष्मण जगतापांनी भविष्यात त्यांची राजकीय धुरा शंकर जगतापांकडे देणार, हे अनेकांना बोलून दाखवली होती. त्यामुळे वहिनींनी यानिमित्ताने दिरावर पुन्हा एकदा निशाणा साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जगताप कुटुंबातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
‘तुझ्या सडक्या वृत्तीचे आणि बुद्धीचे प्रदर्शन’
शंकर जगताप यांनी माऊली जगतापांना प्रभाग क्रमांक 31 मधून उमेदवारी दिली. मुळात माऊली हे प्रभाग क्रमांक 29 मध्ये राहायला आहेत. त्यामुळे माऊलीने प्रभाग 31 मध्ये अतिक्रमण केल्याचा भाजप पदाधिकाऱयांचा आरोप आहे. अश्विनी जगताप यांनी आपल्या पोस्टमध्ये 15 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झाले असे म्हणणाऱ्या माऊली जगताप हे स्वप्न पाहताना तुला तुझीच लाज कशी वाटली नाही? जेव्हा स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप आपल्या कर्तृत्वाने राजकारण गाजवत होते, तेव्हा तू त्यांच्याच सावलीत बसून त्यांच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास? याचा अर्थ असा की, तू 15 वर्षे भाऊबरोबर नव्हता, तर त्यांच्या ‘शेवटाची’ वाट पाहत होता. ज्या भाऊंनी तुला ओळख दिली, त्यांच्याच विरुद्ध इतकी वर्षे मनात विष पेरून ठेवले? हे स्वप्न नाही, तर ही ‘नमकहरामी’ आहे माऊली. विजयाचा गुलाल उधळताना भान विसरलास, पण लक्षात ठेव ते तुझे स्वप्न नाही तर तुझा सडक्या वृत्तीचे आणि बुद्धीचे प्रदर्शन आहे, अशी खरमरीत पोस्ट अश्विनी जगताप यांनी केली आहे.
























































