
अज्ञात मार्ग दाखवण्यासाठी गूगल मॅपची मोठी मदत होत असल्याने प्रत्येक जण याचा वापर करतो. मात्र याच गूगल मॅपमुळे जीव धोक्यात आल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक केरळमध्ये उघडकीस आली आहे. गूगल मॅपच्या चुकीच्या निर्देशामुळे कार ओढ्यात वाहून गेली. पण वेळीच प्रसंगावधान राखल्याने वृद्ध जोडपे सुखरुप बचावले.
केरळमधील कोट्टायम येथील 62 वर्षीय जोसी जोसेफ आणि त्यांची 58 वर्षीय पत्नी शीबा मनवेट्टम येथील जोसीच्या मित्राच्या घरी चालले होते. मित्राच्या घरचा रस्ता शोधण्यासाठी त्यांनी गूगल मॅपची मदत घेतली. गूगल मॅपच्या मार्गदर्शनानुसार ते कार चालवत होते. मात्र गूगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवला अन् कार थेट ओढ्यात शिरली.
सुदैवाने जोसी यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ कार थांबवली. त्यांनी वेळीच कारचे दरवाजे उघडले आणि गाडी वाहून जाण्यापूर्वी दोघेही बाहेर पडले. ओढ्यात वाहून जाता जाता वाचली आणि पुढील अनर्थ टळला. ओढ्याजवळ उपस्थित स्थानिक लोक आणि लाकूड गिरणीतील कामगारांनी ही बाब पाहिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेत वृद्ध जोडप्याला पाण्यातून बाहेर काढले.