
ब्रिटनच्या लिव्हरपूल शहरात सोमवारी विचित्र अपघात घडला आहे. फुटबॉल प्रीमियर लीग ट्रॉफी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चाहते जमले होते. त्यावेळी एक अनियंत्रित कार हजारो लोकांच्या गर्दीत घुसली आणि सुमारे डझनभर लोकांना चिरडले. या अपघातात 27 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला 53 वर्षीय ब्रिटिश नागरिक आहे, जो लिव्हरपूल परिसरातील रहिवासी आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमागील कारणे शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मर्सीसाइड पोलिसांनी सांगितले की, खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या संघाच्या ओपन-टॉप कोचने शहराच्या मध्यभागी विजय मिरवणूक काढली तेव्हा या अनियंत्रित कारने जमावाला धडक देत अनेकांना चिरडले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात फुटबॉल चाहत्यांच्या मोठ्या गर्दीत वेगाने जाणारी एक कार दिसत आहे आणि काही क्षणातच अनेक लोकांना त्याची धडक बसली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी ही घटना धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत योग्य त्या उपायोजना करणाऱ्या पोलिस आणि आपत्कालीन सेवांचे त्यांनी कौतुक केले. तसेच या घटनेमागे घातपाताची शक्यता आहे का, याचाही शोध घेण्यात येत आहे.