
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील बावली टोक–चिरेखिंड परिसरात आज पहाटे मोटार 400 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातानंतर प्रतापगड सर्च ऍण्ड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, स्थानिक ग्रामस्थ आणि पोलादपूर पोलिसांच्या मदतीने धाडसी पद्धतीने थरारक बचावकार्य राबवत जखमी पाचजणांना सुखरूप वाचविले.
अजय सुनील संकपाळ, तुकाराम संकपाळ, सुनील संकपाळ, पार्थ संकपाळ आणि संगीता संकपाळ (सर्व रा. लाखवड, जि. सातारा) हे प्रवासी जखमी झाले आहेत.
सातारा जिह्यातील लाखवड गावचे ग्रामस्थ मुंबईहून गावी येत होते. पहाटे आंबेनळी घाटातील बावली टोक–चिरेखिंडदरम्यान वाहनाचा ताबा सुटल्याने वॅगनआर मोटार दरीत कोसळली. मोटार 400 फूट खोल दरीत जाऊन अडकली. अपघाताची माहिती प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमला मिळाली. रेस्क्यू टीमचे अजित जाधव, अनिकेत वागदरे, संकेत सावंत आणि ऋषिकेश जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनाही माहिती देण्यात आली.
घाटातील खोल आणि अवघड दरीमुळे बचावकार्य करणे आव्हानात्मक होते. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोरांच्या (रोप) साहाय्याने टीमचे सदस्य दरीत उतरले आणि जखमी प्रवाशांपर्यंत पोहोचले. सर्वात आधी गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला स्ट्रेचरमध्ये सुरक्षित ठेवून रोपच्या मदतीने वर आणले. त्यानंतर इतर जखमींनाही काळजीपूर्वक दरीतून बाहेर काढले. या धाडसी आणि समन्वयपूर्ण बचाव मोहिमेमुळे रेस्क्यू टीमचे कौतूक होत आहे.
या बचावकार्यात प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमसह महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील बाबा भाटिया, अमित कोळी, सुजित कोळी आणि सोमनाथ वागदरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. याशिवाय वाडा कुंभरोशी आणि चिरेखिंड येथील ग्रामस्थांनी मदतीचा हात देत सहकार्य केले. पोलादपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारीही बचावकार्यात सहभागी झाले होते.

























































