पैशांच्या वाटपावरून राडे! ठाण्यात नोटांची बंडले वाटणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची धुलाई

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरले असतानाच आज दिवसभर मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी पैशांच्या वाटपावरून राडे झाले. कुठे ईव्हीएमचा डेमो दाखवत मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ घडवले, तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पाकिटातून गुपचूप पैसे वाटले जात होते. ठाण्यामध्ये तर नोटांची बंडले वाटणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच धुलाई करण्यात आली. नोटाछाप प्रचार करणाऱ्यांना शिवसैनिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये भूषण भोईर हे शिंदे गटात बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. प्रचाराची अधिकृत वेळ संपली असतानादेखील सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांचे काही कार्यकर्ते पैसेवाटप करीत असल्याची कुणकुण शिवसैनिकांना लागली. अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे यांनाही ही बाब समजली. मतदारांना पैसे वाटताना या कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडून त्यांना थेट कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेले.

भाजपच्या उमेदवारांसाठी पैशांचे वाटप करीत असलेल्या दोन कार्यकर्त्यांची मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार धुलाई केल्याचा प्रकार नेरुळ आणि पनवेलमध्ये घडला आहे. नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक 24 मधील भाजपच्या उमेदवारांसाठी एक व्यक्ती मतदारांना पैसे वाटत असताना त्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडले. त्याच्याकडे अडीच लाख रुपयांची रोकड सापडली. दुसरा प्रकार पनवेलमधील प्रभाग क्रमांक 17 मध्ये घडला. भाजपचे कार्यकर्ते पैशांचे वाटप करीत असताना मनसेचे योगेश चिले यांनी त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्याकडून लाखो रुपयांची रोकड आणि मतदारांच्या नावांची यादी हस्तगत करण्यात आली आहे.

पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला शिवसैनिकांनी चोपले

प्रभाग क्रमांक 16मध्ये भाजपचे नरेश भालेराव आणि अनिकेत राठोड यांच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती शिवसेना उपशहरप्रमुख सतीश कटकटे यांना भाजपच्याच कार्यकर्त्याने दिली. त्यानंतर शिवसैनिकांनी सर्व प्रभाग पिंजून काढत एका व्यक्तीला मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे बरीच पाकिटे आढळली. त्या पाकिटावर मतदाराचे नाव आणि रकमेचा उल्लेख असल्याचे सतीश कटकटे यांनी सांगितले. भाजपच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना शिवसैनिकांनी रंगेहाथ पकडले आणि चोपले. या झटापटीत भाजपचे इतर कार्यकर्ते पळून गेले.

डोंबिवलीत शिंदे यांचे दोन उमेदवार पोलिसांच्या ताब्यात

डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये रात्री भाजप आणि शिंदे गटात रक्तरंजित राडा झाला होता. भाजप कार्यकर्ते मतदारांना पैसेवाटप करत असल्याचा आरोप करत शिंदे गटाचे उमेदवार रवी पाटील, नितीन पाटील यांच्यासह सात कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांचे डोके फोडले होते. याप्रकरणी पोलिसांनी रवी पाटील आणि नितीन पाटील यांना ताब्यात घेतले आहे.

जळगावात 29 लाख रोकड, 3 किलो सोने, 8 किलो चांदी जप्त

जळगावात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारमधून 29 लाखांच्या रोकडसह 3 किलो सोने आणि 8 किलो चांदी जप्त केली. ममुराबाद नाका येथे तपासणीदरम्यान हा मुद्देमाल आढळला. सराफा दुकानांसाठी हे सोने-चांदी नेत आहोत, असे कारमधील तिघांनी सांगितले मात्र त्यांच्याकडे त्याच्या पावत्या नव्हत्या. त्यामुळे जप्तीची कारवाई करण्यात आली.

भिवंडीत चाकूहल्ला; मीरारोडमध्ये पैसे वाटणाऱ्या महिलेला अटक

भिवंडीत समीर मोमीन याने आलम फारुखी यांच्यावर चाकूने हल्ला केला, तर आंजूरफाटा येथे मध्यरात्री चेतन पाटील यांना भाजपच्या उमेदवार निलेश चौधरी यांचे बंधू योगेश चौधरी व त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली. तर मीरारोडमध्ये पैसे वाटताना शिंदे गटाच्या ऋतुजा दळवी यांना पकडले. त्यांच्यावर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बोरिवलीत भाजपकडून मिक्सरवाटप

बोरिवली शांतीनगर प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपकडून मतदारांना मिक्सरवाटप करण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी व्हिडीओच सोशल मीडियावर शेअर केला आहे. मतदारांना आमीष दाखवल्याबद्दल संबंधितांना निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. भाजपला हरण्याची भिती असल्यामुळेच असे प्रकार सुरू असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

चेंबूरमध्ये शिंदे गटाकडून पैसे वाटप

चेंबूरमधील प्रभाग क्र. 153 मध्ये शिंदे गटाकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी केला आहे. पैसेवाटपाचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचा दावाही पाटणकर यांनी केला आहे. पैसेवाटपाविरोधात शिवसेनेच्या उमेदवार मीनाक्षी पाटणकर यांनी निवडणूक अधिकारी, पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत व्हिडीओत दिसणाऱ्या पप्पू भाटी याला ताब्यात घेण्यात आले आहे. पप्पू भाटी हा शिंदे गटाचा पदाधिकारी असल्याचे समजते. या ठिकाणी शिंदे गटाकडून माजी आमदार तन्वी काते या निवडणूक लढवित आहेत.

प्रतीक्षानगरमध्ये भाजपने वाटली पैशाची पाकिटे

प्रतिक्षानगर प्रभाग क्र. 173 मधील भाजपच्या उमेदवार शिल्पा केळुसकर यांच्याकडून मतदारांना पैशाची पाकिटे वाटल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रतीक्षानगरमधील संक्रमण शिबिरातील इमारत क्रमांक टी-52 मधील मतदारांना भाजपकडून पैसे वाटप करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले. या बाबत मनसेकडून एफ/उत्तर निवडणूक अधिकार्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. केळुस्कर यांनी आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही मनसेने केली आहे.

‘लाडकी बहीण’च्या नावाखाली ताडदेवमध्ये भाजपचे पैसे वाटप गुजराती महिलांनीच रोखले

ताडदेवमधील प्रभाग क्र. 215 मध्ये पैसे वाटायला आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिक आणि स्थानिक महिलांनी हिसका दाखवला. भाजप कार्यकर्त्यांना रोखताच त्यांनी तिथून पळ काढला. ही बाब कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली भाजपच्या प्रदीप छेडा आणि प्रकाश मोरे यांच्यामार्फत हे पैसे वाटप होत होते. सर्वप्रथम इमारतीतील दोन गुजराती महिलांनी त्यांना रोखत याबाबत जाब विचारला. त्यावर काहीच उत्तर न देता हे कार्यकर्ते पळाले. त्यानंतर इमारतीखाली शिवसैनिकांनी त्यांना गाठले व फैलावर घेतले.