
महापालिकेच्या निवडणुकीसाठी होणाऱया मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. महापालिकेच्या निवडणूक भरारी पथकाने केलेल्या नाकाबंदीत एका दुचाकीस्वाराकडे पाच लाख 60 हजार रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. निवडणूक भरारी पथकाने ही रक्कम जप्त केली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व महामार्गांवर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली. गंगाखेड नाका येथील पथक क्रमांक एक मधील कोतवालीचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांच्यासह आचारसंहिता विभागाच्या पथकाने वाहनांची तपासणी केली असता. एमएच 22 एएल 21 38 या दुचाकीच्या डिक्कीत पाच लाख 60 हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. या रकमेबद्दल दुचाकीस्वाराकडे विचारणा केली असता त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तसेच रकमेबाबत कोणतेही कागदपत्रे नसल्याने भरारी पथकाने पंचनामा करत ही रक्कम जप्त केली. मध्यरात्री दीडच्या सुमारास जप्तीची कारवाई करण्यात आली. रोख जप्तीची ही निवडणुकीतील परभणीतील पहिलीच कारवाई ठरली आहे.






























































