
बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या चौकशी अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत त्याची माहिती दिली. त्यावेळी डय़ुटीवर असलेल्या दोन सेविकांनी कामचोरपणा केला नसता तर अत्याचाराची घटना घडलीच नसती असे चौकशीत आढळल्याचे केसरकर यांनी सांगितले. तसेच घटनेच्या दिवसांतील शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब असून त्याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
बदलापूर येथील शाळेत घडलेल्या प्रकारासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली होती. शिक्षण विभागाचे उपसंचालक संघवी, महिला बाल हक्क आयोगाच्या सुशीबेन शाह यांच्यासह या समितीत शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीने आपला प्राथमिक अहवाल दिला आहे. त्याबाबत शिक्षणमंत्री केसरकर यांनी आज माहिती दिली. मुलींना शौचालयात घेऊन जाण्यासाठी कामिनी गायकर, निर्मला भुरे या दोन सेविका होत्या. त्यांची डय़ुटी होती लहान मुलांना शौचास नेणे. या दोघी चौकशीला उपस्थित नव्हत्या. त्यांना काही बोलायचे नाही असे गृहीत धरून आम्ही पुढील कारवाईसाठी पाठवले. या दोघी हजर असत्या तर ही घटना घडली नसती. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून सहआरोपी करावे असे सांगितल्याची माहिती केसरकर यांनी दिली.
वर्गशिक्षिका, मुख्याध्यापिका, संस्था पदाधिकाऱ्यांवर पोक्सो कारवाईची शिफारस केल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. शाळेच्या पदाधिकाऱ्यांना घटनेची माहिती असतानाही कारवाई केली नाही, असेही त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाने चौकशी पूर्ण केली असून आता पुढील चौकशी गृह विभाग करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षणमंत्र्यांची
अत्याचाराच्या घटनेतील मुलीला सरकारकडून 10 लाखांची मदत केली जाईल आणि जिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झालेला आहे तिला तीन लाख रुपयांची मदत करणार आहे. दोघींच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी मी घेत असून त्यांना दर महिन्याला चेक स्वरूपात ती दिली जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.
पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करा
13 ऑगस्टला ही घटना घडली. वर्गशिक्षिका दीपाली देशपांडे यांना 14 तारखेला मुलींच्या आजीआजोबांनी ही गोष्ट सांगितली होती. पण त्यांनी पोलिसांना कळवले नाही. मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनाही या घटनेची माहिती होती. पण त्यांनीही पोलिसांना कळवले नाही. त्यामुळे पोक्सो कायद्याच्या कलम 19 (2) आणि 21 (1) अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस करण्यात आल्याचे केसरकर यांनी सांगितले.
पोलीस आणि रुग्णालयांकडूनही जाणीवपूर्वक दिरंगाई
पीडित मुलीची खासगी रुग्णालयात 15 तारखेला तपासणी केली गेली. त्यानंतर आजीआजोबांनी एफआयआर दाखल केला. संध्याकाळी ते पोलीस ठाण्यात गेले होते. पण रात्री 10 वाजून 17 मिनिटांनी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या बाबतची चौकशी पोलिसांनी करावी. उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाने मुलीला वेळेत तपासले नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. त्याची चौकशी आरोग्य विभागाने करायला हवी. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी. शाळेवर प्रशासक नेमला आहे. मॅनेजमेंट कमिटी का बरखास्त करू नये, अशी नोटीस बजावली आहे. मॅनेजमेंट दोषी असेल तर कडक कारवाई करण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले.