1 एप्रिलपासून जनगणनेचा पहिला टप्पा, घरांची यादी आणि माहिती गोळा करणार; अधिसूचना जारी

केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, देशात होणाऱ्या 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरदरम्यान पार पडेल. याची सुरुवात घरांची यादी तयार करणे आणि घरांचा डेटा गोळा करण्यापासून होईल. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यांच्या येथे 30 दिवसांत हे काम पूर्ण करतील.

केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी अधिसूचना जारी करून सांगितले की, 1 एप्रिलपासून देशभरातील सर्व घरे आणि कुटुंबांची यादी तयार केली जाईल. तसेच कुटुंबांची इतर माहितीदेखील गोळा केली जाईल.

सरकारने असेही म्हटले आहे की, घरांची यादी तयार करण्यास सुरुवात होण्यापूर्वी 15 दिवस लोकांना स्वतः माहिती भरण्याचा (सेल्फ एन्यूमरेशन) पर्यायदेखील दिला जाईल.

जनगणना पूर्णपणे डिजिटल  

सरकारने सांगितले की, यावेळी जनगणना पूर्णपणे डिजिटल असेल. सुमारे 30 लाख कर्मचारी मोबाईल ऍपद्वारे माहिती गोळा करतील. मोबाईल ऍप, पोर्टल आणि रिअल टाइम डेटा ट्रान्सफरमुळे जनगणना मोठय़ा प्रमाणात पेपरलेस होईल. हे ऍप ऍण्ड्रॉईड आणि आयओएस दोन्हीवर काम करतील.

जातींची गणना

 जातीशी संबंधित डेटादेखील डिजिटल पद्धतीने गोळा केला जाईल. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जनगणनेत जातींची गणना समाविष्ट केली जाईल. यापूर्वी, इंग्रजांच्या काळात 1931 पर्यंत जाती-आधारित जनगणना झाली होती.  वास्तविक पाहता जनगणना 2021 मध्ये होणार होती, परंतु कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती, जी आता 2027 मध्ये पूर्ण होईल. 2011 च्या मागील जनगणनेनुसार हिंदुस्थानची लोकसंख्या सुमारे 121 कोटी होती. त्यात सुमारे 51.5 टक्के पुरुष आणि 48.5 टक्के महिला होत्या.