अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण, आजपासून होणार ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन दोन वर्ष उलटली तरी अद्याप उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव धाराशिव करण्यात आले नव्हते. त्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून सतत पाठपुरावा केला जात होता. त्यासाठी ओमराजेंनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून बुधवारी रेल्वेकडून नाव बदलाचा जीआर काढण्यात आला. या जीआरनुसार उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव धाराशिव रेल्वे स्थानक करण्यात आले आहे.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे. ”पाठपुराव्याला यश…! अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण – आता ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’. उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचं नाव आता अधिकृतपणे ‘धाराशिव’. हा केवळ एक बदल नाही, तर आमच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा विजय आहे! असे त्यांनी ट्विट केले आहे.