
मध्य रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱयांचे प्रमाण वर्षागणिक वाढतेच आहे. गेल्या वर्षभरात मेल-एक्सप्रेस आणि लोकल ट्रेनमधील तिकीट तपासणी मोहिमांमध्ये 41.90 लाख विनातिकीट प्रवाशांना कारवाईचा दणका देण्यात आला. त्यांच्याकडून 251.91 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा (आर्थिक वर्ष 2025-26) फुकटय़ा प्रवाशांच्या संख्येत 10 टक्क्यांची वाढ झाली. कठोर कारवाईच्या उपायानंतरही विनातिकीट प्रवास करणाऱयांना जरब बसलेली नाही.
रेल्वे प्रशासनाद्वारे मेल-एक्सप्रेस आणि लोकल ट्रेनमध्ये सातत्याने तिकीट तपासणी मोहिमा घेतल्या जात आहेत. विशेष तिकीट तपासणी पथकांनी 2025-26 मध्ये विनातिकीट आणि अवैध तिकिटासह प्रवास करणाऱया 41.90 लाख प्रवाशांना पकडले. मागील वर्षी हा आकडा 38.05 लाख होता. त्यावरून फुकटय़ांच्या संख्येत 10 टक्क्यांची वाढ झाल्याचे उघड होत आहे. यंदा फुकटय़ांकडून विक्रमी 251.91 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत दंडाच्या रक्कमेत 24 टक्के वाढ झाली. मेल-एक्सप्रेसमध्ये पकडलेल्या 29.27 लाख प्रवाशांकडून 213.31 कोटी रुपये, तर लोकलमधील 12.63 लाख फुकटय़ा प्रवाशांकडून 38.86 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
एसी लोकलमध्ये सर्वाधिक फुकटे
एसी लोकलमधून फुकटात प्रवास करणाऱयांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढले आहे. यंदा एसी लोकलमधून फुकट प्रवास करणाऱया 1.23 लाख प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून 3.89 कोटी रुपये दंड वसूल केला होता. मागील वर्षी 98,681 प्रवाशांना पकडले होते.
विभागनिहाय कारवाई
विभाग प्रवासी संख्या दंड (रुपये)
मुंबई 17.97 लाख 80.98 कोटी
भुसावळ 9.63 लाख 81.28 कोटी
पुणे 4.73 लाख 30.15 कोटी
नागपूर 4.54 लाख 28.36 कोटी
सोलापूर 2.53 लाख 11.62 कोटी
मुख्यालय 2.48 लाख 19.51 कोटी






























































