
मध्य रेल्वे मार्गावर लोकल, मेल-एक्प्रेस व मालगाडी चालवणाऱ्या महिला लोको पायलट, मोटरवुमनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात विश्रांती घेण्याकरिता मोटरवुमनसाठी उभारलेल्या राखीव विश्रामगृहांमध्ये पुरुषांचा वावर सुरू असतो. याबाबत तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे महिला सुरक्षेला धक्का देणारे अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे.
स्वारगेट आगारात एसटी बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. महिलांच्या सुरक्षेतील त्रुटी चव्हाटय़ावर आल्या आहेत. यादरम्यान मध्य रेल्वेवरील मेल- एक्प्रेस, लोकल व मालगाडय़ा चालवणाऱ्या महिला लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, मोटरवुमन, ट्रेन मॅनेजर या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत. या महिला कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 100 आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात 10 ते 11 तास गाडी चालवण्याचे धाडस महिला कर्मचारी दाखवतात. प्रशासनाने त्यांच्यासाठी राखीव विश्रामगृहे आणि प्रसाधनगृहे बांधलेली आहेत, मात्र त्या ठिकाणी पुरुष कर्मचाऱ्यांचा वावर रोखण्याकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. रेल्वे प्रशासन त्यांच्यावर कारवाई का करीत नाही? महिला सुरक्षेचे प्रशासनाला सोयरसुतक नाही का? असे संतप्त सवाल मोटरवुमन, लोको पायलट आदी महिला कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
महिला सुरक्षेबाबत तातडीने एसओपी जाहीर करावी!
लोकल, मेल-एक्प्रेस व मालगाडी चालवणाऱ्या ‘रनिंग स्टाफ’मधील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत तातडीने पावले उचलावीत, महिला सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेत तातडीने एसओपी जाहीर करावी, अशी मागणी रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी केली आहे.
प्रसाधनगृहांमध्ये माथेफिरूंचा उपद्रव
मध्य रेल्वेने महिला कर्मचाऱ्यांसाठी ठिकठिकाणी प्रसाधनगृहे बांधली आहेत, मात्र तेथे सुरक्षा रक्षक नसल्यामुळे माथेफिरूंचा उपद्रव सुरू असतो. त्यामुळे महिला लोको पायलट व मोटरवुमनमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकदा आमची डय़ुटी मध्यरात्री इगतपुरी, वसई, लोणावळा, रोहा या ठिकाणी संपते. अशा वेळी तेथील प्रसाधनगृहांचा वापर करताना आमची सुरक्षा धोक्यात असते, अशी प्रतिक्रिया एका मोटरवुमनने दिली.
या स्थानकांवर विश्रामगृहे
उपनगरी लोकल मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, सानपाडा, ठाणे, कळवा, कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, कर्जत, कसारा, खोपोली, वाशी, बेलापूर, पनवेल तसेच इगतपुरी व लोणावळा येथे मेल-एक्प्रेस व मालगाडीच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृहे आहेत.